

पुणे: खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर तसेच धरणाच्या पुढील भागातील खुले पाणलोटक्षेत्रात (फ्री कॅचमेंट एरिया) पाऊस झाल्यास मुठा नदीची पातळी नेमकी किती वाढते, हे अचूकपणे समजण्यासाठी खडकवासला ते संगमवाडीदरम्यान मुठा नदीवरील पुलांच्या खांबांवर मार्किंग केले जाणार आहे. महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी याबाबतचे आदेश आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिले आहेत.
यासंदर्भात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी नुकतीच एक आढावा बैठक घेतली. या बैठकीत पूरस्थितीची शक्यता लक्षात घेऊन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असतानाच पाणलोटक्षेत्रात जोरदार पाऊस झाला होता. (Latest Pune News)
त्या वेळी केवळ दोन हजार क्युसेक विसर्ग असूनही भिडे पुलापर्यंत पाणी पोहोचले होते. तसेच, महापालिकेच्या हद्दीतील वारजेमधील बाह्यवळण मार्गावरील पूल, राजाराम पूल, म्हात्रे पूल, एस.एम. जोशी पूल, लकडी पूल, गाडगीळ (झेड) पूल, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल, टिळक पूल, नवापूल आणि संगमवाडी पूल अशा प्रमुख पुलांवर मार्किंग केले जाणार आहे.
एकतानगरी व पाटील इस्टेट भागात बसवणार भोंगे
गेल्या वर्षी मुठा नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका बसलेल्या एकतानगरी परिसरात तसेच पाटील इस्टेट भागात नागरिकांना वेळेवर पुराची पूर्वसूचना मिळावी, या साठी या दोन्ही ठिकाणी ध्वनिक्षेपक (सायरन) यंत्रणा व सीसीटीव्ही बसवण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.