पुणे: गेल्या दीड वर्षापासून रखडलेल्या महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेला राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यानुसार आता 171 जागांसाठी जाहिरात भरती प्रक्रिया या पदांसाठी दीड वर्षापूर्वी अर्ज केलेल्या 27 हजार 879 उमेदवारांचे अर्ज कायम ठेवण्याचे निर्देशही नगरविकास विभागाने महापालिकेला दिले आहेत.
महापालिकेतील कनिष्ठ अभियंता पदाच्या 113 पदांच्या भरतीसाठी प्रशासनाने जानेवारी 2024 ला जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यासाठी 27 हजार 879 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यानंतर राज्य शासनाने सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदु नियमावली लागू करण्याचे आदेश दिले होते. (Latest Pune News)
मात्र, महापालिकेकडून संबंधित भरतीच्या जाहिरातीत सामाजिक आरक्षण, शैक्षणिक मागास वर्गाकरिताचे आरक्षण टाकण्यात आले नव्हते. त्यामुळे शासनाने याबाबत बिंदु नियमावलीची नोंद अद्ययावत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने बिंदु नियमावलीची नोंद अद्ययावत करत सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाकरिता आरक्षण टाकून भरतीसाठी सुधारित जाहिरात करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या सगळ्या प्रक्रियेत ही भरती प्रक्रिया दीड वर्ष रखडली.
त्यामुळे या भरती प्रक्रियेसाठी या पूर्वी आलेल्या 27 हजार 879 उमेदवारांच्या अर्जांचे करायचे काय, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावर महापालिकेने नगरविकास विभागाकडून अभिप्राय मागविला होता. त्यावर ‘नगरविकास’ने महापालिकेने दिलेल्या 113 पदांच्या जाहिरातीऐवजी आता रिक्त असलेल्या 171 पदांसाठी सुधारित जाहिरात प्रसिद्ध करून भरतीची कार्यवाही राबविण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत.
वयोमर्यादा ओलांडलेल्या अर्जदारांना दिलासा
नगरविकास विभागाने दिलेल्या अभिप्रायानुसार, जानेवारी 2024 मध्ये ज्या 27 हजार 879 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यांना जातीचा प्रवर्ग सुधारित करण्याची संधी देण्यात यावी. तसेच, ज्यांचे पूर्वीचे अर्ज आहेत, त्यामधील ज्यांनी वयाच्या मर्यादा ओलांडली आहे, अशा उमेदवारांना सुधारित जाहिरातीद्वारे अर्ज करण्याची मुभा देण्यात यावी, असेही निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत.