पुणे : पुढारी वृत्तसेवा : आजवर तीन ते चार हजार उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांचा हिशेब हिंदुंनी मागितलेला नाही. मुस्लिमांसाठी ज्याप्रमाणे मक्का आणि मदिना पवित्र आहेत, त्याचप्रमाणे हिंदुंसाठी काशीतील ज्ञानवापी आणि मथुरेतील कृष्ण जन्मस्थळ पवित्र आहेत. मुस्लिमांच्या दृष्टीने तेथे फक्त मशीद आहे, त्यामुळे त्यांनी ती स्वतःहून हिंदुंना सुपूर्द करावी आणि हिंदुंनी राष्ट्रहितासाठी येथेच थांंबावे, असे आवाहन ज्येष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ के. के. मोहम्मद यांनी केले.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर येथे आयोजित भारत : विरासत आणि संस्कृती या विषयावर मोहम्मद यांनी चंबळ खो-यातील बटेश्वर मंदिर शृंखलेचे पुनर्निमाण आणि राम मंदिराच्या सर्वेक्षणासंदर्भात माहिती दिली. पुणे संवाद, डेक्कन कॉलेज आणि भांडारकर संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी फोर्स मोटर्सचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया, डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. प्रमोद पांडे, संवादचे संयोजक मनोज पोचट, केदार नाईक आदी उपस्थित होते.
मोहम्मद यांनी सांगितले की, काशी आणि मथुरेतील जन्मस्थळाशी ना प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा संबंध आहे, ना एखाद्या औलियाचा संबंध आहे. परंतु हिंदूंसाठी ते देवांचे जन्मस्थान आहे. हिंदू समुदायाने मध्ययुगीन कालखंडात उद्ध्वस्त झालेली तीन ते चार हजार मंदिरे मागितलीच नाहीत. त्यांनी तसे केले तर देशात हाहाकार माजेल. देशाच्या हिताच्या दृष्टीने हिंदूंनी येथेच थांबावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
ते म्हणाले, मध्यप्रदेशातील चंबळच्या खो-यात बटेश्वरच्या उत्खननासाठी किंवा मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी भाजप सरकारने पुरेसा निधी दिला नाही, अशी खंतही मोहम्मद यांनी व्यक्त केली. दरोडोखोरांमुळे बटेश्वराचे मंदिर सुरक्षित राहिले. पण, त्यांचा खात्मा झालवर तेथे खानमाफियांनी उच्छाद मांडला. त्यावेळी भाजप सरकारने काही मदत केली नाही. शेवटी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक के. सुदर्शन यांना पत्र लिहिल्यावर यंत्रणा हालली असा प्रसंग मोहम्मद यांनी सांगितला.
हेही वाचा