

प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे: महापालिकेच्या रुग्णालयात ‘पेड’ आयसीयू, ससूनमधील आयसीयूमध्ये ‘वेटिंग’ आणि खासगी रुग्णालयांमधील आयसीयू ‘फुल्ल’, अशी स्थिती शहरात पाहायला मिळत आहे. खासगी रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागात सध्या श्वसनमार्गाचा तीव्र संसर्ग, हृदयविकाराचा झटका, अपघात, ब्रेन स्ट्रोक, अशा स्वरूपाचे रुग्ण असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.
रुग्णांची ससेहोलपट थांबण्यासाठी कोरोना काळाप्रमाणे शहरातील सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालयांमधील बेडबाबतची अद्ययावत माहिती पोर्टलवर उपलब्ध व्हावी, अशी मागणी होत आहे. (Latest Pune News)
अनेक रुग्णांना सध्या आयसीयू बेड मिळवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. शहरातील सुमारे 1000 रुग्णालयांमध्ये केवळ 1200 ते 1500 आयसीयू बेड उपलब्ध आहेत. ससून रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात ताण असल्याने तेथे आयसीयूसाठी कायम प्रतीक्षा करावी लागते. दुसरीकडे खासगी रुग्णालयांमध्येही 90-100 टक्के खाटा भरलेल्या आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना तातडीचे उपचार मिळावेत, यासाठी नातेवाइकांची धावपळ होत आहे.
सध्या आयसीयू बेडची मागणी खूप वाढली आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे दिसून येत असल्याने रुग्णालयांमध्ये दाखल करावे लागणार्या आणि आयसीयू बेड लागणार्या रुग्णांचे प्रमाण नगण्य आहे. आजारांची तीव्रता जास्त असलेल्या रुग्णांना आयसीयूची गरज लागू शकते.
आयसीयू बेडचे नियोजन रोटेशन पद्धतीने
गंभीर अवस्थेमध्ये असलेल्या रुग्णांना अतिदक्षता विभागात तातडीने हलवावे लागते. सध्या काही रुग्णालयांमधील आयसीयू 90 टक्के, तर काही 100 टक्के क्षमतेने भरलेले आहेत. रुग्णांची प्रकृती, त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यासाठी लागणारा कालावधी, त्यांच्यामध्ये होणारी सुधारणा या सर्व निकषांचा विचार करून आयसीयूमधील खाटांचे नियोजन केले जात असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शहरातील मोठ्या रुग्णालयांमधील आयसीयू बेडची मागणी दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोना काळात सर्वच रुग्णालयांनी खाटांची संख्या वाढवली होती. प्रौढ, बालके आणि नवजात शिशू अशा विविध अतिदक्षता विभागांतील खाटा 80 ते 90 टक्के खाटा फुल्ल असतात. रुग्णांची प्रकृती लक्षात घेऊन आयसीयूमध्ये दाखल करणे किंवा जनरल वॉर्डमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला जातो.
- डॉ. हनमंत साळे, अध्यक्ष, हॉस्पिटल असोसिएशन ऑफ इंडिया
सध्या केईएम रुग्णालयात श्वसन संक्रमण, अपघात, हृदयविकार अशा स्वरूपाचे रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. साधारणपणे 80-90 टक्के बेड फुल्ल आहेत. रुग्णांच्या आजाराचा प्रकार, गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना किमान एक तर जास्तीत जास्त दोन ते तीन आठवडे आयसीयूमध्ये ठेवावे लागते. रुग्णांना आयसीयूमधील उपचार कधीही नाकारले जात नाहीत.
- डॉ. प्रदीप डिकोस्टा, केईएम रुग्णालय
रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये दर्जेदार आरोग्यसेवा पुरवणे हे डॉक्टरांचे कर्तव्य आहे. अतिदक्षता विभागातील रुग्णांना अत्यावश्यक उपचार तातडीने पुरवले जातात. गंभीर स्थितीमध्ये असलेल्या रुग्णांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल केले जाते. सध्या आमच्या रुग्णालयांमध्ये 80- 90 टक्के आयसीयू खाटा भरलेल्या आहेत.
- डॉ. शिरीष प्रयाग, प्रयाग हॉस्पिटल