पुणे: नाना पेठेतील इनामदार चौकामधील एका बोर्डाला स्पर्श झाल्याने रविवारी (दि. 1) शाळकरी मुलीचा मृत्यू झाला होता. दरम्यान, संबंधित फलक व त्याला घेतलेले विद्युत जोड हे अनधिकृत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. मुलीच्या मृत्यूनंतर पालिकेने शहरातील अनधिकृत विद्युत जोड व बेकायदा फलकावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
नाना पेठेतील इनामदार चौकात एका फलकाला स्पर्श झाल्याने मुलीचा मृत्यू झाला होता. दरम्यान, हा खांब विद्युत विभागाचा नसल्याचे कारण सांगत या प्रकरणी पालिकेने कारवाई करणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट केले होते. (Latest Pune News)
यामुळे पालिकेच्या कारभारावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या प्रकरणी पालिकेने चौकशी केली असता संबंधित फलक हा माजी नगरसेवक स्वर्गीय उदयकांतजी आंदेकर यांच्या नावाचा असून, त्या बोर्डला घेण्यात आलेला विद्युत जोडदेखील अनधिकृतपणे घेण्यात आल्याचे पालिकेने स्पष्ट केले. संबंधित फलक हा विद्युत पोलपासून साधारणपणे पाच ते सात फूट अंतरावर आहे.
दरम्यान, या घटनेमुळे शहरातील अनधिकृत फलक व त्याला घेण्यात आलेले अनधिकृत विद्युत जोड याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. एका मुलीच्या मृत्यूनंतर पालिकेच्या विद्युत विभागाला अखेर जाग आली असून शहरातील अनधिकृत फलक व त्याला लावण्यात येणारे विद्युत जोड काढून संबंधित व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.
मुलीच्या मृत्यूशी आमचा संबंध नाही: महावितरण
नाना पेठ येथे डोके तालीम परिसरात वीज खांबामध्ये उतरलेल्या वीज प्रवाहाचा धक्का बसून सातवर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर मुलगा जखमी झाला आहे. रविवारी (दि. 1) घडलेल्या या घटनेतील वीजखांब हा पथदिव्याचा आहे. त्याचा वीजपुरवठा, देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही पुणे महानगरपालिकेकडे आहे. या दुर्दैवी घटनेशी महावितरणचा कोणताही संबंध नाही, असे स्पष्टीकरण महावितरणकडून देण्यात आले आहे.
शॉक लागून शाळकरी मुलीचा झालेला मृत्यू हा दुर्दैवी आहे. त्यामुळे आम्ही आता शहरातील अनधिकृत फलकांना जोडण्यात आलेले विद्युत कनेक्शन शोधून काढून अशांवर दंडात्मक कारवाई करणार आहोत. यासाठी वॉर्ड स्तरावरील कनिष्ठ अभियंत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
- मनीषा शेकटकर, प्रमुख, विद्युत विभाग, पुणे महानगरपालिका