

पुणे: पूर्वीच्या वादातून टोळक्याने वारजेतील म्हाडा कॉलनीतील घरांवर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्या. त्यानंतर जबरदस्तीने खिशातील पैसे काढून घेऊन, पार्किंगमधील दुचाकीचे पेट्रोलचे झाकण उघडून आत पेटती काडी टाकून दुचाकीला आग लावून दिल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत शिवम जाधव (वय 22, रा. वारणा बिल्डिंग, म्हाडा कॉलनी, वारजे माळवाडी) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अश्रू अडसूळ (वय 21), नागेश साठे (वय 23) आणि अमोल उमाप (वय 21, रा. भवानी पेठ) यांना अटक केली आहे. त्यांचा म्होरक्या असलेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही घटना वारजे माळवाडी येथील म्हाडा कॉलनीमधील वारणा बिल्डिंगमध्ये 2 जून रोजी पहाटे 2 वाजता घडली. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादीत दोन महिन्यांपूर्वी म्हाडा कॉलनी येथे देवीचा कार्यक्रम असताना वाद झाला होता. त्यावेळी कोणी तक्रार दिली नव्हती. दरम्यान, 2 जून रोजी पहाटे 2 वाजता फिर्यादी झोपले असताना अचानकपणे घराचे दरवाजावर लोखंडी हत्याराने मारल्याचा आवाज आला.
या टोळक्याने आणखी दोन घरांवर दगडफेक करून त्यांच्या काचा फोडल्या होत्या. तेव्हा सर्व जण खाली आले. आरोपी टोळके लोखंडी हत्यार घेऊन उभे होते. आरोपीने माझ्या नादाला लागू नको, नाही तर तुला संपवून टाकेल, अशी धमकी दिली. त्यावेळी अश्रू अडसूळ याने फिर्यादीच्या खिशातील 500 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. ते मोठ्याने ओरडू लागले. त्यांचा गोंधळ ऐकून कॉलनीमध्ये लोक जमा झाले. आरोपींनी त्यांच्या हातातील लोखंडी हत्यारे हवेत फिरवून “आम्ही इकडचे भाई आहोत, कोणी आडवे आले तर त्यांना संपवून टाकेन अशी धमकी दिली.