

पुणे : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रात्री एका नाटकाचा प्रयोग सुरू होत होता. तिसरी घंटा झाली आणि आता पडदा उघडून नाटक सुरू होणार तोच एका महिला प्रेक्षकाच्या पायाला उंदराने चावा घेतला. त्यामुळे त्या घाबरून आरडाओरडा करत नाट्यगृहाबाहेर पडल्या. उंदरामुळे त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. यामुळे त्यांना प्रतिबंधात्मक लस टोचून घेण्याची वेळ आली... ही घटना आहे शनिवारी (दि. 31) रात्रीची. या घटनेची पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असून, त्यामुळे महापालिकेच्या नाट्यगृहांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रमांसह नाटकांचे प्रयोग होत असतात. मात्र, अशा या गर्दी खेचणार्या नाट्यगृहांच्या दुरुस्ती देखभालीकडे आणि स्वच्छतेकडे प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही. त्यामुळे कलाकार आणि प्रेक्षक हैराण झाले आहेत. कधी वातानुकुलीत यंत्रणेत बिघाड तर कधी नाट्यगृहात प्रयोगादरम्यान मांजरी अन् उंदरांचा वावर... अशा कित्येक गोष्टींचा त्रास प्रेक्षक, कलाकारांना सहन करावा लागत आहे.
मध्यंतरी बालगंधर्व रंगमंदिरात मांजरींचा वावरही दिसून आला होता. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात घडलेल्या या प्रकाराची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. याबाबत संबंधित महिला प्रेक्षकाच्या नातेवाईकांनाही दुजोरा दिला आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन नाट्यगृह प्रशासनाने त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी, उंदरांचा उपद्रव कमी करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी प्रेक्षकांसह कलाकारांकडून केली जात आहे.
आता या घटनेनंतर प्रशासनालाही जाग आली असून, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आज मंगळवारी (दि.3) सांस्कृतिक विभाग, विद्युत विभाग आणि भवन विभागाची संयुक्त बैठक होणार आहे. त्यात नाट्यगृहातील समस्या आणि त्यावर करावयाचे उपाय यावर चर्चा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या नाट्यगृह विभागाचे मुख्य व्यवस्थापक राजेश कामठे यांनी दै. ‘पुढारी’च्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात जाणवणार्या विविध समस्यांबद्दल संवाद पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन म्हणाले, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील समस्या तशा नवीन नाहीत. कधी एसी यंत्रणेतील बिघाड तर कधी उंदरांचा वावर... या समस्यांनी प्रेक्षक आणि कलाकार हैराण झाले आहेत. महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाने याकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे. कलाकार, नाट्यसंस्था हे पैसे खर्चून नाटकाचा प्रयोग आयोजित करतात, तर प्रेक्षकही तिकिटाचे पैसे खर्चून प्रयोगाला येतात. त्यांना सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे प्रेक्षक आणि कलाकारांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर कायमस्वरुपी उपाय करणे गरजेचे आहे.