

पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) अभ्यास मंडळाच्या वतीने, ‘आयसीएआय’ पुणे शाखा व ‘विकासा’ शाखेच्या सहकार्याने सीए विद्यार्थ्यांसाठी कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्समध्ये 8 व 9 नोव्हेंबर 2025 या दोन दिवशी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. ‘अग्रिया : लिडिंग माईंड, शेपिंग फ्युचर’ या संकल्पनेवरील या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन माजी केंद्रीय शिक्षणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे, अशी माहिती ‘आयसीएआय’ पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार व परिषदेच्या समन्वयिका सीए प्रज्ञा बंब यांनी दिली.(Latest Pune News)
सीए सचिन मिणियार म्हणाले, ‘सीए विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही परिषद अतिशय महत्त्वाची असते. देशभरातून 2000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला आहे. विविध विषयांवर दोन दिवस तज्ज्ञांची मार्गदर्शन सत्रे होणार आहेत. ज्ञानवृद्धी, कौशल्य विकास यासह करिअरच्या संधी आणि चर्चासत्राचा यामध्ये समावेश आहे. ‘आयसीएआय’च्या अभ्यास मंडळाचे चेअरमन सीए रोहित रुवातीया, व्हाईस चेअरमन सीए संजीब संघी, केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.’
सीए प्रज्ञा बंब म्हणाल्या, ‘सीए सुजाता बोगावत यांचे स्टार्टअपवर, सीए ललित वालेचा यांचे जागतिक व उदयोन्मुख संधी यावर, सीए निखिल तोतुका यांचे कृत्रिम बुद्धिमतेवर, सीए (डॉ.) एस. बी. झावरे यांचे वित्तपुरवठा आणि अहवाल यावर, सीए राजेश शर्मा यांचे आर्टिकलशिपवर, सीए अर्पित काबरा यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर, तर आयआरएस हर्षद आराधी यांचे कौशल्यविकासावर मार्गदर्शन सत्र होणार आहे. ‘कॅपिटल मार्केट्स’ विषयावरील चर्चासत्रात सीए रिषभ जैन, सीए यशवंत मंगल, सीए भंवर बोराना विचार मांडणार आहेत. सीए अमृता कुलकर्णी चर्चासत्राचे संचालन करणार आहेत.’