

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कौटुंबिक कारणातून झालेल्या वादात दारूच्या नशेत पतीने मुलांसमोरच पत्नीला मारहाण करून तिचा पायाने गळा दाबून खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 31) पहाटे चारच्या सुमारास माळवाडी-आव्हाळवाडी परिसरात उघडकीस आली आहे. दीपाली संदीप मोरे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी, दीपाली यांच्या 17 वर्षीय मुलीने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती संदीप उत्तम मोरे (वय 41) याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपी संदीप मोरे याला दारूचे व्यसन आहे. तो कौटुंबिक कारणातून सतत पत्नी दीपाली यांना मद्यप्राशन करून मारहाण करत होता. वाद सोडविण्यासाठी आलेल्या नातेवाइकांनादेखील शिवीगाळ करत असे.
27 ऑगस्ट रोजी संदीप याने घरात वाद केला होता. त्यानंतर बुधवारी (दि.30) रात्री परत तो पत्नी दीपाली यांच्याबरोबर वादावादी करत दारू पिण्यासाठी पैसे घेऊन गेला. रात्री दहा वाजता तो परत आला. परत त्याने पत्नीसोबत वाद केला. तिन्ही मुलांना त्याने एका खोलीत कोंडून ठेवले. तर पत्नीला हॉलमध्ये ओढत नेऊन जोरजोरात मारहाण केली. त्यानंतर संदीप याने गाडीतील पेट्रोल आणून पत्नीच्या अंगावर टाकले. दीपाली यांच्या तोंडातून रक्तस्राव होत होता. त्यामुळे मुलांनी त्यांना ओढून घरात नेले. दीपाली मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने बेशुद्ध झाल्या होत्या. संदीप यानेच कपड्याने त्यांच्या तोंडावरील रक्ताचे डाग पुसून फरशी स्वच्छ केली. त्यानंतर तो त्याच ठिकाणी झोपला.
मुलांनी घाबरत सकाळी साडेसहाच्या सुमारास मामाला फोन करून झालेल्या प्रकाराची माहिती दिली. मामा आल्यानंतर दीपाली यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित काइंगडे, गुन्हे निरीक्षक मारुती पाटील, सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी भेट देऊन तत्काळ आरोपी पती संदीप मोरे याला अटक केली.
कौटुंबिक कारणातून झालेल्या वादात पतीने दारूच्या नशेत पत्नीला मारहाण केली त्यानंतर पायाने गळा दाबून तिचा खून केला. याप्रकरणी आरोपीला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
– विश्वजित काइंगडे
वरिष्ठ पोलिस निरीक्षक, लोणीकंद पोलिस ठाणे
हेही वाचा