आढळराव, कोल्हे यांना स्व:तालुक्यात किती मताधिक्य? हे आहे अंदाज..

आढळराव, कोल्हे यांना स्व:तालुक्यात किती मताधिक्य? हे आहे अंदाज..

मंचर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार खा. डॉ. अमोल कोल्हे यांना स्वतःच्या तालुक्यात किती मताधिक्य मिळणार, यावरच विजयाची गणिते सुरू झाली आहेत. चहाच्या कट्ट्यावर महाविकास आघाडी आणि महायुतीतील कार्यकर्ते आपला उमेदवार किती मताधिक्याने विजय होईल याचे आडाखे मांडत आहेत. विजय कोणाचा होणार, याबाबत राजकीय चर्चेतून वातावरण गरम होऊ लागले आहे. आढळराव पाटील आणि डॉ. अमोल कोल्हे यांना त्यांच्या अनुक्रमे आंबेगाव विधानसभा मतदारसंघ आणि जुन्नर विधानसभा मतदारसंघातून कितीचे मताधिक्य मिळणार याबाबत आता कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होऊ लागली आहे.

आंबेगाव तालुक्यातून आढळराव पाटील यांना किती मताधिक्य मिळणार ते मताधिक्य कोल्हे कसे भरून काढणार, की अमोल कोल्हे यांना आंबेगावातून मताधिक्य मिळणार, कोल्ह्यांना तर जुन्नर तालुक्यातून मताधिक्य मिळाले तर आढळराव पाटील ते मताधिक्य कोठे भरून काढणार याबाबत कार्यकर्ते तर्कवितर्क काढत आहेत. आंबेगावपेक्षा जुन्नर तालुक्यात मतदानच कमी झाल्याने त्याचा फटका कोणाला बसणार, आंबेगाव तालुक्यात एकुण 1,90,179 मतदान झाले आहे (62.95टक्के), तर जुन्नर तालुक्यातून 1,81,584/- एकूण मतदान 58.16 टक्के झाले असून यामध्ये कोणाला किती मताधिक्य मिळणार याबाबत चर्चा सुरू आहे.

खरंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप व इतर पक्ष एकत्र येऊन महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे आंबेगाव तालुक्यातून त्यांना चांगले मताधिक्य मिळेल अशी चर्चा रंगू लागली आहे. मात्र आंबेगाव तालुक्यात शरदचंद्र पवार यांना मानणारा मोठा वर्ग असून पक्षात पडलेली फूट यामुळे शरद पवार यांच्याबाबत मतदारसंघात सहानुभूतीची भावना आहे. असेच चित्र जुन्नर तालुक्यात आहे. या मतदारसंघात शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याबरोबर विद्यमान आमदार अतुल बेनके, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष पांडुरंग पवार, माजी आमदार शरद सोनवणे, आशाताई बुचके याचबरोबर महायुतीचे अनेक मातब्बर नेतेमंडळी प्रचारात होते.

आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून आढळराव पाटील यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकरचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विष्णू काका हिंगे, भाजपचे ज्येष्ठ नेते संजयशेठ थोरात, जयसिंगराव एरंडे, तालुका अध्यक्ष संदीप बाणखेले, प्रमोद बाणखेले, नवनाथ थोरात, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सचिन बांगर, प्रमोद थोरात आदी मान्यवरांनी जोरदारपणे प्रचार केला.

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.अमोल कोल्हे जुन्नर तालुक्यातील असल्याने तसेच त्यांना विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर , शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष माऊली खंडागळे आणि त्यांच्या सहकार्‍यांची तसेच आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम धोंडीभाऊ भोर, गणेश यादव, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर आणि त्यांच्या सहकार्‍यांची साथ असल्याने जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील त्यांना मताधिक्य मिळेल अशी चर्चा सुरू आहे.

आंबेगाव व जुन्नर तालुका हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ शेजारी-शेजारी आहेत. दोन्ही मतदारसंघात एकमेकांचे अनेक नातेवाईक, मित्रपरिवार, संगे-सोयरे हे वास्तव्यास आहेत. अनेकांचा कामानिमित्त दैनंदिन संपर्कदेखील आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील मतदार एकमेकांच्या नातेवाईकांना फोनद्वारे, समक्ष भेटून तुमच्या तालुक्यातील वातावरण कसे आहे, कोणाला मताधिक्य मिळेल, आमच्या तालुक्यातून कोणता उमेदवार वरचढ ठरेल याबाबत चर्चा करताना दिसून येत आहे. त्यामुळे मतदान झाल्यानंतरही मतमोजणीपर्यंत वातावरण गरम राहील अशी चर्चा सुरू आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news