तीर्थक्षेत्र अरणला ’अ’ दर्जा मिळवून देणार : गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

तीर्थक्षेत्र अरणला ’अ’ दर्जा मिळवून देणार : गृहनिर्माण मंत्री अतुल सावे

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : शासकीय व प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून अरण (ता. माढा, जि. सोलापूर) या तीर्थक्षेत्रास अ दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी नुकतेच दिले. समाजातील दानशूर व्यक्तींनी या प्रकल्पाला सढळ हाताने भरघोस मदत करावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले.

महात्मा जोतिबा फुले मंडळ (पिंपरी-चिंचवड) आणि श्री संत शिरोमणी सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वाकड येथे एका बैठकीचे आयोजन केले होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी श्री संत सावता महाराज यांचे वंशज हभप रविकांत महाराज वसेकर, सावता महाराज वसेकर, साखरचंद महाराज लोखंडे, महादेव महाराज भुजबळ, उद्योजक ध्रुव कानपिळे, अमृत शेवकरी, निलेश गिरमे, माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, सामाजिक कार्यकर्त्या वंदना आल्हाट, उद्धव भुजबळ, महात्मा ज्योतीबा फुले मंडळाचे अध्यक्ष हनमंत माळी, सचिव अनिल सांळुखे आदी उपस्थित होते.

सावे म्हणाले की, माळी समाजाचे उर्जाकेंद्र असलेले तीर्थक्षेत्र अरण हे शक्तीसंपन्न व प्रेक्षणीय करणे, ही आपल्या प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. ती साकारण्यासाठी प्रत्येकाने तळमळीने काम करावे. या प्रसंगी उद्योजक प्रशांत डोके यांनी संपूर्ण प्रकल्पाला सीमाभिंत बांधून देण्याचे आश्वासन दिले. महात्मा जोतिबा फुले मंडळाचे अध्यक्ष हणमंत माळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या प्रकल्पाच्या आतापर्यंतच्या कामाचा संपूर्ण आढावा हभप प्रभू महाराज माळी यांनी उपस्थितांसमोर मांडला. माजी नगरसेवक वसंत लोंढे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

समाजातून 1 कोटीचा निधी जमा

संत सावता महाराज यांची जन्मभूमी असलेल्या तीर्थक्षेत्र अरण या ठिकाणी तीन एकर क्षेत्रामध्ये भक्त निवास प्रकल्प साकारणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 30 कोटी रुपये इतका खर्च आहे. हा प्रकल्प साकारण्यासाठी पुणे जिल्ह्यातील विशेषकरून पिंपरी-चिंचवड व चाकण परिसरातील समाजबांधवांनी आत्तापर्यंत जवळपास 1 कोटीचा निधी उभारला आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी या कामासाठी 25 लाख रुपयांची प्राथमिक मदत देऊ केली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news