औसा; पुढारी वृत्तसेवा : किल्लारीतील 1993 च्या प्रलंयकारी भूकंपाने काही क्षणांत मोठा आघात केला. अशावेळी दशदिशांनी मदतीचे हात पुढे आले, ही मानवताच इथल्या माणसांना धीर अन् आधार देणारी ठरली. त्यामुळे माझ्याऐवजी अशा दानशुरांप्रती कृतज्ञता व्यक्त करा. या सन्मानाचे तेच खरे मानकरी आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
भूकंपग्रस्त 52 गावांतील तरुणांनी शनिवारी किल्लारी येथे खा. शरद पवार यांच्या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले. त्यावेळी ते बोलत होते.
शरद पवार पुढे म्हणाले, भूकंप झाल्याबरोबर मी सकाळी 6 वाजता किल्लारीला आलो. गावेच्या गावी उद्ध्वस्त झाली होती. सारे काही भयावह आणि हिंमत खचवणारे होते. त्यामुळे परत फिरण्याऐवजी येथील लोकांत राहून त्यांना धीर देण्याचे ठरवले व इथेच 8 दिवस मुक्काम केला. सकाळी 6 ते रात्री 2 वाजेपर्यंत मी 52 गावांत गेलो. लोकांना धीर दिला. भूकंपग्रस्त भागात मदतीसाठी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, विविध आंतरराष्ट्रीय संघटना, जागतिक बँक, विविध सामाजिक संघटनांचे खूप मोठे सहकार्य लाभले.
बैलगाडीत झोपलेली व्यक्ती जिल्हाधिकारी होती. या भागात फिरत असताना रस्त्याच्या कडेला बैलगाडीत एक व्यक्ती झोपलेली मला दिसली. मी त्यांना उठवले, ते लातूरचे जिल्हाधिकारी प्रवीणसिंह परदेशी होते, असे सांगत पवार यांनी परदेशी यांचा गौरवपूर्ण शब्दांत उल्लेख केला.