

पुणे : पुढारी वृत्तसेवा
खाद्यतेलाची साठेबाजी करणार्यांविरोधात शासनाने कडक पाऊल उचलले आहे. शासनाने खाद्यतेल आणि तेलबियांचा साठा करण्यावर निर्बंध लागू केले असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढत असलेल्या खाद्य तेलांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने हा निर्णय घेतला आहे.
सध्या लागू करण्यात आलेले निर्बंध 30 जूनपर्यंत राहणार आहेत. खाद्यतेल आणि तेलबियांचे सध्या करण्यात आलेला साठा शासनाकडून घालण्यात आलेल्या मर्यादेच्या प्रमाणात ठेवावा, अन्यथा संबंधित व्यापार्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे,' असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, देशात सर्वाधिक आयात पामतेलाची केली जाते.
इंडोनेशिया, मलेशियातून पामतेलाची आयात करण्यात येते. दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना, ब्राझील या देशातून सोयाबीन तेलाची आयात केली जाते. युक्रेनमधून सूर्यफूल तेलाची आयात करण्यात येते.
प्रतिकूल हवामानामुळे अर्जेंंटिना, ब्राझील या देशात सोयाबीनच्या उत्पादनात 40 टक्के घट झाली आहे. त्यामुळे यंदा प्रथमच अमेरिकेतून सोयाबीन तेल आयात केले. युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थती असल्याने तेथून होणारी सूर्यफूल तेलाची आयात अपेक्षेएवढी होत नसल्याचे खाद्यतेल व्यापार्यांकडून सांगण्यात आले.
ज्या रिफायनरी, मिलर, एक्स्ट्रॅक्टर, घाऊक किंवा किरकोळ व्यापारी, विक्रेत्यांकडे विदेश व्यापार महानिदेशालय यांच्याकडून आयात-निर्यातीबाबतचा सांकेतिक क्रमांक आहे, या घटकांकडील साठा निर्बंधांच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास त्याची माहिती https://evegoils.nic.in या अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर करावी लागणार आहे. तसेच संबंधितांनी त्यांच्याकडील साठा 30 दिवसांत घालून दिलेल्या मर्यादेत ठेवावा लागणार आहे.
खाद्यतेल किरकोळ बाजारातील विक्रेत्यांना 30 क्विंटल, घाऊकसाठी विक्री करणार्यांना 500 क्विंटलची मर्यादा आहे. तेलबियांसाठी किरकोळ बाजारातील विक्रेत्यांना 100 क्विंटल, तर घाऊकसाठी विक्री करणार्यांना दोन हजार क्विंटल मर्यादा असणार आहे