‘हिट अँड रन’; अपघातानंतर पळून जाण्याचे प्रमाण वाढतंय

‘हिट अँड रन’; अपघातानंतर पळून जाण्याचे प्रमाण वाढतंय

[author title="संतोष शिंदे " image="http://"][/author]

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पुण्यामध्ये एका धनिकपुत्राच्या भरधाव अलिशान कारच्या धडकेत दोघे चिरडून ठार झाले. या घटनेचे देशभर पडसाद उमटले असून 'हिट अँड रन' चा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मागील चार महिन्यांत घडलेल्या तब्बल 32 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांना अद्याप धागा सापडला नसून तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

हिट अँड रन म्हणजे काय रे भाऊ..!
ज्या प्रकरणांमध्ये वाहनाच्या धडकेनंतर चालक घटनास्थळावरून पळून जातो, अशी प्रकरणे 'हिट अँड रन' म्हणून गणली जातात. अपघातातील जखमी व्यक्तीला वेळीच रुग्णालयात नेल्यास किंवा प्राथमिक उपचार मिळाल्यास जीव वाचू शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे 'हिट अँड रन' हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जातो.

रात्रीच्या वेळी 'हिट अँड रन'
रात्री पादचारी किंवा दुचाकीस्वाराला चिरडून पळून जाणे सहज शक्य होते. अंधारात वाहन क्रमांक देखील टिपला जात नाही. तसेच, वाहनाच्या प्रखर लाईट कॅमेर्‍यावर पडल्याने सीसीटीव्हीतही स्पष्ट चित्र कैद होत नाही. त्यामुळे दिवसाच्या तुलनेत रात्रीच्या वेळी 'हिट अँड रन' प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते.

चालकांना वाटते मारहाणीची भीती
अपघातानंतर बघ्यांची गर्दी गाडी चालकावर तुटून पडते. अपघातास कोण कारणीभूत ठरले, कोणाची चूक झाली, याचा कोणीही विचार करत नाही. अशा मारहाणीत जिव्हारी फटका लागण्याची भीती चालकांना असते, ज्यामुळे चालक घटनास्थळावरून पळून जातात.

… मदत करा
प्राणांतिक अपघात झाल्यानंतर इतर वाहनचालक किंवा पादचारी संबंधित चालकाला मारहाण करतात. त्यामुळे गोंधळ उडून वाहतूक कोंडीचा फज्जा होतो. मारहाण करण्यापेक्षा नागरिकांनी जखमींना उपचार मिळवून देण्यास मदत करणे अपेक्षित आहे; तसेच कायदा हातात न घेता आरोपी चालकाला सुरक्षित पोलिसांच्या स्वाधीन करावे. ज्यामुळे 'हिट अँड रन'चे प्रमाण आपोआपच कमी होईल, असे जाणकारांचे मत आहे.

प्रभावी कलमांचा वापर आवश्यक

अपघातानंतर जखमीला रस्त्यावर सोडून गेल्यानंतरही पोलिस 304 (अ) कलम लावतात. अशा वेळी 304 (2) नुसार गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. या दोन्ही कलमांमध्ये फरक आहे. 'जो कोणी हयगयीचे अगर निष्काळजीपणाचे, बेदरकारपणाचे कृत्य करून मृत्यू घडवितो; परंतु तो सदोष मनुष्यवध होत नाही. त्यास कोणत्याही एका प्रकारच्या कारावासाची शिक्षा जी दोन वर्षांपर्यंत असू शकेल, अगर द्रव्यदंड अगर दोन्ही शिक्षा होतील. अशी या कलमाची व्याख्या आहे. या व्याख्येनुसार मृत्यू घडविण्यामागे आरोपीचा इरादा किंवा त्याला जाणीव नसते; मात्र त्याने केलेले कृत्य हे बेदरकारपणाचे, हयगयीचे, निष्काळजीपणाचे असते.

हा गुन्हा प्रथम न्यायधीशापुढे (जेएमएफसी) चालवला जातो. तर, 'जाणीवपूर्वक केलेले कृत्य' अशी भादंवि कलम 304 (2) ची व्याख्या आहे. आपण करीत असलेल्या कृत्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता आहे, याची आरोपीला माहिती असल्यामुळे या कलमाचा वापर प्रभावी ठरतो. या कलमाच्या वापरामुळे हा गुन्हा बिगर जामिनाचा व सेशन कमिट (जिल्हा सत्र न्यायालयात चालणारा) होतो. परिमंडळ एकचे तत्कालीन पोलिस उपायुक्त मंचक इप्पर यांनी तब्बल 51 गुन्ह्यांमध्ये भादंवि कलम 304 (2) चा वापर केला होता.

चार महिन्यांत 122 अपघात

उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये प्राणांतिक अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चार महिन्यांत तब्बल 122 जणांना अपघातामध्ये आपला जीव गमावा लागला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये मागील चार महिन्यांत 122 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील 32 आरोपी चालक घटनास्थळावरून पळून गेले आहेत. संबंधित प्रकरणातील आरोपी चालकांचा शोध सुरू आहे.

– सतीश माने, सहायक आयुक्त, पिंपरी-चिंचवड.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news