

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कुठलाही देव मोठा नसतो. तर त्या देवाचे भक्त मोठे असतात. श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज हे भगवान श्रीगणेशाचे भक्त होते. आज जिथे गणपती आहे, तिथे मोरया महाराज आहेत. हा भक्तीचा महिमा आहे, असे प्रतिपादन श्री भगवानगड संस्थानचे प्रमुख मठाधिपती नामदेवशास्त्री महाराज यांनी केले. श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सवास शुक्रवारी (दि. 29) सुरुवात झाली. श्री भगवानगड संस्थानचे प्रमुख मठाधिपती नामदेवशास्त्री महाराज यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते.
याप्रसंगी चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, आमदार उमा खापरे, आयुक्त शेखर सिंह, पिंपरी चिंचवड शहर भाजप अध्यक्ष शंकर जगताप, माजी नगरसेवक सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, अश्विनी चिंचवडे, राजाभाऊ गोलांडे, राजेंद्र काटे, विठ्ठल भोईर, नामदेव ढाके, देवस्थानचे विश्वस्त जितेंद्र देव, राजेंद्र उमाप, केशव विद्वांस, देवराज डहाळे आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या इंग्रजी संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. साधक म्हणून नेहमी मोरया गोसावी महाराजांच्या सेवेत राहू, असे आश्वासन भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिले.विश्वस्त जितेंद्र देव यांनी प्रास्ताविक केले. नाना शिवले यांनी सूत्रसंचालन केले. देवराज डहाळे यांनी आभार मानले.
हेही वाचा