Hinjewadi Murder Case: प्रेयसीची हत्या केली, रात्रभर मृतदेहाशेजारी बसला; सकाळी स्वतःच पोलिसांना फोन केला, हिंजवडीत नेमकं काय घडलं?

Hinjewadi Murder Case: पुण्यातील हिंजवडी परिसरात इन्फोसिसमध्ये काम करणाऱ्या शुभम काळबांडे याने प्रेयसी कोमल डहाळे (२७) हिची मारहाण करून हत्या केल्याचा आरोप आहे.
Hinjewadi Murder Case
Hinjewadi Murder CasePudhari
Published on: 
Updated on: 

Hinjewadi Murder Case: पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात प्रेमसंबंधातून घडलेल्या एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. एका सॉफ्टवेअर अभियंत्याने आपल्याच प्रेयसीची मारहाण करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, हत्या केल्यानंतर आरोपी रात्रभर तरुणीच्या मृतदेहाशेजारी बसून होता. सकाळी त्याने स्वतः पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणीचे नाव कोमल डहाळे (वय २७) असे आहे. ती मूळची वर्धा येथील रहिवासी होती. कोमल हिंजवडी परिसरातील विप्रो कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होती. तर आरोपी शुभम ज्ञानेश्वर काळबांडे (वय ३१) हा इन्फोसिस कंपनीत काम करत होता. दोघांची ओळख आयटी क्षेत्रात काम करत असताना झाली होती. पुढे या ओळखीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले.

कोमल आणि शुभम गेल्या साडेतीन वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. दोघेही गेल्या दोन ते तीन वर्षांपासून एकत्र राहत होते. त्यांच्या लग्नालाही कुटुंबीयांची संमती होती. मात्र, काही महिन्यांपासून त्यांच्यात वारंवार वाद होऊ लागले होते.

दुसऱ्या तरुणीशी संबंध असल्याचा संशय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभमचे दुसऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय कोमलला होता. याच कारणावरून दोघांमध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सतत वाद होत होते. या वादांचा त्यांच्या नात्यावर परिणाम होत होता.

रविवारी रात्री (२२ नोव्हेंबर) दोघेही एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. जेवण झाल्यानंतर ते हिंजवडीतील साखरेवस्ती परिसरातील कोमल राहत असलेल्या पीजीच्या खोलीत परतले. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा त्यांच्यात वाद झाला.

यानंतर पहाटे तीनच्या सुमारास वाद अधिक वाढला. रागाच्या भरात शुभमने कोमलला मारहाण केली. तिचे डोके भिंतीवर आणि बेडवर आपटले. तसेच हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कोमलचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Hinjewadi Murder Case
Pune Rapido Bike Taxi: पुण्यात रॅपिडोची बाइक टॅक्सी सेवा बंद होणार? कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल

हत्या केल्यानंतर रात्रभर मृतदेहाशेजारी बसून राहिला

या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, कोमलचा मृत्यू झाल्यानंतरही शुभमने खोली सोडली नाही. तो रात्रभर तिच्या मृतदेहाशेजारी बसून राहिला. सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्याने स्वतः हिंजवडी पोलीस ठाण्यात फोन केला. घटनेची माहिती देतानाच त्याने रुग्णवाहिकेची मदतही मागितली.

फोन आल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कोमलला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी शुभमला ताब्यात घेतले.

Hinjewadi Murder Case
Pune Cycle Track Project: पुण्यात ४५ कोटींच्या सायकल ट्रॅकच्या कामाचा दर्जा संशयात; पहिल्याच थरात रस्ता उखडला!

पोलिसांकडून पुढील तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. दोघेही उच्चशिक्षित असून नामांकित आयटी कंपन्यांमध्ये काम करत होते. तसेच त्यांच्या लग्नाला कुटुंबीयांची संमती असल्याची माहितीही समोर आली आहे. असे असताना संशय आणि वारंवार होणाऱ्या वादातून या नात्याचा इतका भयानक शेवट झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शुभम काळबांडे याला ताब्यात घेण्यात आले आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.