Ratnagiri Crime : वालोपेतील खून तंबाखूच्या भांडणातून

मैत्रिणीच्या कॉलवरून आरोपीचा माग काढला
Ratnagiri Crime : वालोपेतील खून तंबाखूच्या भांडणातून
Pudhari File Photo
Published on: 
Updated on: 

रत्नागिरी : चिपळुणातील वालोपे येथे नवनाथ कांबळे यांचा दगडाने ठेचून खून करणाऱ्या आरोपी पवन आंबेडे याचा माग काढण्यासाठी पोलिसांनी त्याच्या मैत्रिणीच्या मोबाईलवर येणाऱ्या-जाणाऱ्या कॉलचा आधार घेतला. तांत्रिक तपासातून आरोपी कोल्हापुरातील राजारामपुरी येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर चिपळूण पोलिस पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. महिनाभरापूर्वी तंबाखू देण्याघेण्यावरून नवनाथ आणि आरोपी यांच्यात वाद झाला होता. त्याच वादाचा राग मनात धरून १७ नोव्हेंबर रोजी वालोपे येथे पुन्हा समोरासमोर आल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि त्यातून खून घडल्याचे तपासात पुढे येत आहे.

महिनाभरापूर्वी तंबाखूच्या कारणावरून नवनाथ कांबळे आणि आरोपी पवन आंबेडे यांच्यात भांडण झाले होते. त्यानंतर १७ नोव्हेंबर रोजी वालोपे येथे दोघे पुन्हा समोरासमोर आले. जुन्या वादावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी नवनाथने आरोपी पवनला मारहाण केली. नशेत असलेल्या पवनने नवनाथला खाली पाडून दगडाने ठेचले. या हल्ल्यात नवनाथचा मृत्यू झाला.

खून घडल्यानंतर आरोपीने एका मुलाकडून मोबाईल घेत आपल्या मैत्रिणीला फोन केल्याची माहिती तपासात पुढे आली. पोलिसांनी संबंधित मुलाकडून मैत्रिणीचा मोबाईल क्रमांक मिळवला. त्यानंतर त्या क्रमांकावर येणाऱ्या-जाणाऱ्या कॉलची माहिती तपासून आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. तांत्रिक तपासातून आरोपीची ओळख आणि त्याचे ठिकाण निश्चित करण्यात पोलिसांना यश आले.

पवन आंबेडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर घरफोडीचे अनेक गुन्हे असल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. तो तडीपारही होता. नशेत असताना दिवसाढवळ्या घरफोड्या करण्याची त्याची गुन्हेगारी पद्धत असल्याचे समोर आले आहे. तांत्रिक तपासातून तो कोल्हापुरातील राजारामपुरी येथे असल्याचे निष्पन्न होताच चिपळूण पोलिसांचे पथक त्याच्या मागावर रवाना झाले. तेथे त्याला ताब्यात घेण्यात आले.

आरोपीच्या अटकेमुळे त्याच्याशी संबंधित अन्य घरफोडीच्या गुन्ह्यांचाही तपास होण्याची शक्यता असून, परिसरातील घरफोड्यांना आळा बसण्यास मदत होईल. या खून प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.