[author title="सागर शितोळे" image="http://"][/author]
हिंजवडी : पायाभूत सुविधांच्या अभावामुळे मागील तब्बल दोन वर्षांत 35 आयटी कंपन्यांनी येथून प्रस्थान केले आहे. त्यामुळे आयटीयन्सची पहिली पसंती हिंजवडी असली तरीदेखील केवळ सुविधांचा अभाव असल्याने अनेक कंपन्यांनी येथून काढता पाय घेतला आहे. वास्तविक 'वर्क फ्रॉम होम' नंतर अनेक कंपन्यांनी रस्ते आणि सुविधांच्या अभावामुळे अद्यापही पूर्णपणे कामास सुरुवात केली नाही. त्यामुळे अनेक कंपन्यांनी येथे नव्याने गुंतवणूक करण्यास असमर्थता दर्शवली आहे.
अपुरे रस्ते आणि वाहतूककोंडीमुळे अनेक आयटी कर्मचार्यांनी येथील रहिवासी सोसायटीमध्ये सदनिका घेतल्या आहेत. मात्र, त्यांनादेखील अनेक समस्यांनी ग्रासले आहे. अनेक सोसायटीमध्ये परेसे पाणी नाही. त्यामुळे टँकरवर अवलंबून रहावे लागते आहे. प्रशासन आणि बिल्डर यासंबंधी काहीच कारवाई करत नाहीत. त्यामुळे स्वत:चे घर असूनही अनेकांना मनस्ताप होत आहे. तसेच, स्वत:च्या घरात राहताही येइन आणि घर सोडताही येइना, अशी स्थिती कर्मचार्यांची झाली आहे.
कोलकत्ता, हैदराबाद या ठिकाणी कॅम्पस आहेत. काही ब्रिटिश बेस कंपन्यांचे अधिकारी हिंजवडीत आले असता, त्यांना येथील समस्या जाणवल्या. त्यामुळे कामात सुटसुटीतपणा आणण्यासाठी ते आपला प्रोजेक्ट हलवतात. येथे काम करणार्या सुमारे सहा लाख कर्मचार्यांना आणि दीड लाख वाहनांना ये-जा करण्यासाठी केवळ एकच रस्ता आहे. त्याचीही दुरवस्था झालेली आहे. पाच किलोमीटर प्रवासासाठी तासंतास प्रवास करावा लागतो. यास राजकीय इच्छाशक्तीदेखील कमी पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. गृहविभाग वगळता इतर विभागात मात्र विकास आणि इन्फ्रास्ट्रक्चर याबाबत कमालीची उदासीनता आहे. त्यामुळे भविष्यातही अशा प्रकारे आयटीचे दक्षिणेच्या भागात किंवा इतर देशात जाण्याची शक्यता आहे. कोरोनानंतर बांगलादेश सारख्या देशात आयटीसाठी नव्याने दारे खुली होत असून, आयटी कंपन्यांचे दोन्ही हाताने स्वागत केले जात आहे.
आयटी पार्क हिंजवडीत कार्यरत असणार्या तीन ग्रामपंचायती, एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पीएमआरडीए, जिल्हा परिषद, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यामध्ये योग्य समन्वय नाही. त्यामुळे अनेक रस्ते अद्यापही कागदावर आहेत. तर, मेट्रो अद्यापही सुरू झाली नाही. परिणामी येथील दोन रस्त्यांवर वाहतुकीचा भार आहे. मागील 25 वर्षांत प्रशासनाची ही कासावगतीची चाल पाहून अनेकांनी येथून काढता पाय घेतला आहे. त्यामुळे 'आयटी'तील सुमारे 37 कंपन्यांनी त्यांचे प्रकल्प स्थलांतरित केले आहेत, असा दावा परिसरातील उद्योजक व हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने केला आहे. यात अनेक कंपन्यांनी आपले मोठंमोठे प्रोजेक्ट येथून बाहेर नेले आहेत. तर, अनेक कंपन्यांनी आपली सहाय्यक असलेली कार्यालये येथून हलवली आहेत.
प्रशासन तसेच राज्य आणि केंद्रीय स्तरावरील पाठपुराव्यांमुळे काही प्रमाणात का होईना येथील प्रश्न सुटले. मात्र, रस्त्यांच्या समस्या अद्यापही सुटल्या नाहीत. फेज 1, फेज 2 आणि फेज 3 साठी स्वतंत्र रस्त्याची मागणी असतानादेखील अद्यापही त्यावर काहीच काम होत नाही. येथील काही रस्ते कोर्ट कचेरी आणि निधी अभावी रखडले आहेत. ठिकठिकाणी साचणारे कचर्याचे ढीग, पावसाळ्यात रस्त्यांवर अवतरणारे तळे आदी समस्यांचा परिणाम येथील रोजगारावर होत आहे. आयटीमध्ये सुमारे 250 कंपन्या आहेत. त्यापैकी 50 इंजिनिअरिंग व फार्मा कंपन्या आहेत. यातील सुमारे 80 कंपन्या हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन (एचआयए) चे सदस्य आहेत. सदस्य असलेल्या कंपन्यांनी प्रोजेक्ट हलवल्यास त्यांची नोंद 'एचआयए'कडे होते. मात्र, ज्या कंपन्या सदस्य नाहीत, त्यांच्या स्थितीबाबत नोंद नाही.
प्रामुख्याने बार्कलेस, नाईस, क्रेडिट स्विस, ल्युमीडेक्स यांसारख्या सुमारे 20 हून अधिक बड्या आयटी कंपन्यांनी केवळ पुणेच नाहीतर महाराष्ट्र सोडून हैदराबाद, चेन्नई, बंगळूर व अन्यत्र स्थलांतर केले आहे. तर, वेंचुरा टेक्नॉलॉजी, टी क्यूब सॉफ्टवेअर यांसारख्या लहान कंपन्यांनी हिंजवडी आयटीला राम-राम करुन बाणेर, खराडी आदी ठिकाणी आपले बस्तान मांडले आहे. येत्या काळात आणखी कंपन्या आपले प्रकल्प इतरत्र हलवण्याची शक्यता आहे.
हिंजवडी येथून काही कंपन्यांचे प्रोजेक्ट गेले आहेत. मात्र, तरीही हिंजवडीस अनेक कंपन्यांची पसंती आहे. त्यामुळे काही नवीन कंपन्यादेखील येथे येत आहेत. नव्याने सुरू होत असलेल्या मेट्रोवर पुढील काळात या कंपन्यांचे अस्तित्व राहणार आहे. त्यामुळे हे काम किती लवकर होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
– कर्नल चरणजित भोगल, मुख्य कार्यकारी अधिकारी, एचआयए
हेही वाचा