

पुणे: यंदाचा उन्हाळा विक्रमी उष्णतेचा ठरला आहे. उन्हाळ्यात हवाप्रदूषण कमी होते. यंदा मुंबईसारख्या शहराचे हवाप्रदूषण कमी झालेले असताना पुणे शहराच्या हवेची गुणवत्ता खराब आहे. गत चार वर्षांच्या उन्हाळ्यात ते सातत्याने वाढतच चालले असल्याचा अहवाल रेस्पायर नावाच्या संस्थेने दिला आहे.
लोहगावचा पारा शुक्रवारी 43 अंशांवर असताना कर्वे रस्त्याचे प्रदूषण 177.6 टक्क्यांनी वाढल्याचा धक्कादायक अहवाल हाती आला. याचे प्रमुख कारण शहराच्या विविध भागांत होणारी वाहनकोंडी हेच असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. (Latest Pune News)
यंदाचा उन्हाळा पुणेकरांसाठी असह्य ठरत असून, शुक्रवारी पारा हंगामातील सर्वाधिक 43 अंशावर गेला होता. लोहगाव 43 तर शिवाजीनगर गेले 31 दिवस 41 अंशांवर आहे. त्यात शहरात होणारी प्रचंड वाहतूककोंडी हे मुख्य कारण अहवाल तयार करणार्या शास्त्रज्ञांनी दिले आहे. पुणे शहरातील ‘रेस्पायर लिव्हिंग सायन्सेस’ या संस्थेने हा अहवाल तयार केला आहे.
यातील देशभरातील आठ ते दहा शहरे निवडली असून, यात पुणे शहरासह मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, पाटणा, चंदीगड, लखनौ, कोलकाता, हैदराबाद, बंगरुळू, चेन्नई या शहरांचा समावेश आहे. यात 2021 ते 2024 या उन्हाळी हंगामातील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास केला आहे. त्यात पुणे शहराच्या हवेच्या गुणवत्तेविषयी विशेष अभ्यास करण्यात आला आहे. यात पुण्यातील आठ ते दहा रस्त्यांवरील प्रदूषणाचा अहवाल दिला आहे.
2021 ते 2024 दरम्यान उन्हाळी हंगामातील सर्वािधिक प्रदूषण कर्वे रस्त्यावर...
रेस्पायर संस्थेच्या शास्त्रज्ञांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, आयआयटीएम या संस्थांनी नोंदविलेल्या हवेच्या गुणवत्तेवर आधारित हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
यात त्यांनी दावा केला आहे की, 2021 ते 2024 च्या उन्हाळी हंगामात कर्वे रस्त्यावर सर्वाधिक प्रदूषण वाढले असून, ते 2021 ते 2024 या चार वर्षांत तब्बल 177.6 टक्क्यांनी वाढले आहे. त्यापाठोपाठ आळंदी रस्ता, कोथरूड, म्हाडा कॉलनी, हडपसर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, निगडी या भागांचा क्रमांक लागतो.
पीएम 10 च्या घटकाचे वाढले प्रमाण...
हवामानशास्त्रात हवाप्रदूषणात पीएम (पार्टिक्युलेट मॅटर) 2.5 आणि पीएम 10 यांना अतिसूक्ष्म आणि सूक्ष्म धूलिकण संबोधले जाते. हे जे प्रदूषण मोजले आहे, ते फक्त 10 पीएमचे मोजले आहे. या प्रकारच्या सूक्ष्म धूलिकणांचे प्रमाण कर्वे रस्त्यावर सर्वाधिक वाढले आहे. शिवाजीनगर, स्वारगेट, पिंपरी-चिंचवड या भागांत 2.5 आणि पीएम 10 या धूलिकणांचे प्रदूषण वाढल्याचे अहवालात नमूद केले आहे.
शिवाजीनगरचा पारा 31 दिवसांपासून चाळिशीपार
शहरातील लोहगाव यंदा राज्यातील सर्वाधिक तापमानाच्या शहरांच्या यादीत गेले इतका जास्त उष्मा तेथे आहे. तेथील पारा एप्रिलमध्ये सलग 7 दिवस 43 तर 2 मे रोजीसुद्धा मे 43 अंशांवर गेला. मे महिन्यातील विक्रमी तापमानाकडे शहराची वाटचाल सुरू झाली आहे. तर शिवाजीनगरचा पारा हा सातत्याने 40 ते 41 अंशांवर गेला आहे. एप्रिलचे 30 दिवस आणि मे महिन्यातही तो 41 अंशांवर आहे. शहरातील इतरही सर्वभाग 40 अंशांवर गेले आहे.
प्रदूषण वाढण्याची कारणे...
रस्त्यांवरची वाहतूक कोंडी
वाहनांमधून बाहेर पडणारे धूलिकण
औद्योगिक प्रदूषण
ऋतूनुसार हवेच्या गुणवत्तेत होणारे बदल
काय त्रास होत आहे...
सकाळी उठल्यावर डोळे खाजणे
अंग खाजणे
सतत शिंका येणे
नाक गळणे
श्वास घेताना त्रास होणे
छातीत तणाव तयार होणे
तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय..
सकाळी शुद्ध हवेच्या ठिकाणी फिरा, गर्दीच्या ठिकाणी सतत मास्क घाला, योग, प्राणायाम करा. श्वसनाचा त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. उन्हात फार वेळ फिरू नका. सतत पाणी, सरबत, ताक, पन्हे यांचे सेवन करा.
आम्ही उन्हाळ्यातील दुपारच्या ठरावीक वेळेत हा अभ्यास केला आहे. यात सर्वाधिक प्रदूषण हे कर्वे रस्त्यावर वाढल्याचे अभ्यासातून जाणवते. त्या ठिकाणी 177.6 टक्के हवाप्रदूषणात वाढ झाली आहे. आम्ही हे सर्व रीडिंग केंद्रीय प्रदूषण मंडळाचे वापरले आहेत.
- केविन जोशी, रेस्पायर लिव्हिंग सायन्सेस