

पुणे: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नव्याने घेतल्या जाणार्या 5 मे रोजी होत असलेल्या पुनर्परीक्षेचे प्रवेशपत्र शुक्रवारी जारी केले असून, 27 हजार 837 विद्यार्थ्यांपैकी शुक्रवार सायंकाळपर्यंत 22 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेतल्याची माहिती सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली.
एमएचटी सीईटी परीक्षेत पीसीएम गटातील 27 एप्रिल रोजी एका सत्रातील गणित विषयाच्या ऑनलाइन प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचे पर्याय बदलल्याने 27 हजार 837 विद्यार्थ्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. यामुळे या विद्यार्थ्यांची परीक्षा 5 मे रोजी पुन्हा घेतली जाणार आहे. (Latest Pune News)
गणित विषयातील तब्बल 20 पेक्षा अधिक प्रश्नांच्या पर्यायांची अदलाबदल झाल्याचे हा गोंधळ झाल्याने या सत्रातील सर्व उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा नव्याने ही परीक्षा घेतली जात आहे. यामुळे पुनर्परीक्षेचे प्रवेशपत्र शुक्रवारी दुपारीच संकेतस्थळावर जारी केले असून, 27 हजार 837 विद्यार्थ्यांपैकी शुक्रवार सायंकाळपर्यंत 22 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेतल्याची माहिती सीईटी सेलच्या वतीने देण्यात आली.
परीक्षा देऊन गावी गेलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेला पुन्हा मुंबईला यावे लागले आहे. जे विद्यार्थी परीक्षा झाल्यानंतर मुंबई व पुण्यातून आपापल्या गावी गेले आहेत, त्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याच्याही तक्रारी आहेत.
विधी सीईटीसाठी 79.09 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती...
विधी तीन वर्षे अभ्यासक्रमाची 4 मे रोजी होणारी परीक्षा 2 मे रोजी घेण्यात आली. या परीक्षेला नोंदणी केलेल्या 57 हजार 295 उमेदवारांपैकी 45 हजार 315 उपस्थित राहिले. उपस्थितीचे प्रमाणे 79.09 टक्के इतके होते. 11 हजार 980 विद्यार्थी गैरहजर राहिले. पहिल्या सत्रात सकाळी 8:30 ते 10:30 या वेळेत, 120 परीक्षा केंद्रांवर एकूण 18 हजार 974 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 14 हजार 680 विद्यार्थी उपस्थित राहिले.
त्यांचे उपस्थिती प्रमाण 77.37 टक्के होते. दुसर्या सत्रात, म्हणजे दुपारी 12:30 ते 2:30 या वेळेत, 121 केंद्रांवर 19 हजार 198 उमेदवारांनी नोंदणी केली होती, ज्यापैकी 15 हजार 269 उपस्थित होते. त्यांचे उपस्थिती प्रमाण 79.53 टक्के होते. तिसर्या सत्रात, म्हणजे संध्याकाळी 4:30 ते 6:30 या वेळेत, 121 केंद्रांवर 19 हजार 123 उमेदवारांची परीक्षा होती. त्यापैकी 15 हजार 366 विद्यार्थी उपस्थित होते. त्यांचे उपस्थिती प्रमाण 80.35 टक्के होते.