पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतात एकूण लोकसंख्येच्या 31 टक्के लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून समोर आले आहे. पाचपैकी केवळ एका प्रौढ व्यक्तीचा उच्च रक्तदाब नियंत्रणात असल्याचे अहवाल सांगतो. एकूण रुग्णांपैकी किमान निम्म्या लोकांचा रक्तदाब नियंत्रणात राहिल्यास 2040 पर्यंत भारतातील 46 लाख मृत्यू टाळता येतील, असे अहवालात म्हटले आहे.
दरवर्षी 17 मे हा उच्च रक्तदाब दिवस म्हणून ओळखला जातो. यंदा या दिवसाची थीम 'रक्तदाब अचूकपणे मोजा, नियंत्रित करा आणि दीर्घकाळ जगा' अशी ठरवण्यात आली आहे. उच्च रक्तदाब भारतातील एक गंभीर आणि वाढती आरोग्य समस्या आहे. अंदाजे 20 कोटी प्रौढांना उच्च रक्तदाब असून, केवळ 2 कोटी लोकांचा उच्च रक्तदाब नियंत्रणात आहे. केंद्र शासनाने उच्च रक्तदाबासाठी '25 बाय 25' हे उद्दिष्ट स्वीकारले आहे. पुढील वर्षी म्हणजे 2025 पर्यंत असंसर्गजन्य रोगांमुळे होणार्या अकाली मृत्यूचे प्रमाण 25 टक्क्यांनी कमी करणे आणि उच्च रक्तदाबाचे प्रमाण 25 टक्क्यांनी कमी करणे, या उद्दिष्टाचा त्यात समावेश आहे. चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव, पोषक आहाराची कमतरता, व्यसने ही उच्च रक्तदाबाची प्राथमिक कारणे असून, दरवर्षी उच्च रक्तदाबाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. उच्च रक्तदाबामुळे हृदयरोगाचा धोकाही वाढतो.
वयाच्या तिशी-चाळिशीनंतर उद्भवणारा उच्च रक्तदाब आता लहान मुलांमध्येही आढळून येत आहे. उच्च रक्तदाबामुळे संसर्गजन्य आजारांची शक्यता वाढते. जीवनशैलीतील बदल आणि आरोग्यदायी जीवनशैलीबद्दल जागरूकता निर्माण करणे हे उच्च रक्तदाब रोखण्यासाठी आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. नियमित शारीरिक हालचाली, संतुलित आहार आणि तणाव व्यवस्थापन उच्च रक्तदाब रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात.
हेही वाचा