पुणे : जिल्ह्यात सोमवारी मान्सूनचे आगमन होताच पुणे शहर, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. सतत कोसळणार्या पावसाने जिल्ह्यात सर्व भागांत मोठे नुकसान केले असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा बळी गेला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात 31 मेपर्यंत पावसाचा इशारा दिला आहे. (pune News Update)
गत दहा दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर सुरू आहे. त्यातच सोमवारी प्रत्यक्ष मान्सूनचे आगमन झाले. अवकाळी सुरू असताना मान्सून आजवर कधीच दाखल झालेला नाही. त्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. पूर्व मशागतीची कामे त्याला यंदा करता न आल्याने तो पाऊस कधी थांबेल, याचीच वाट पाहत असल्याचे चित्र यंदा अवकाळी आणि मान्सूनच्या अतिमुसळधार पावसाने निर्माण केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी बारामती, इंदापूर तालुक्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला. कर्हा, निरा, घोड या नद्या दुथडी भरून वाहत असल्याने अनेक गावांतील घरांमध्ये पाणी शिरले आहे. दौंड शहरात सतत तीन दिवस कोसळणार्या
पावसामुळे शिवाजी चौकातील एका जुन्या बांधकामाची भिंत पावसामुळे रविवारी (दि.25) रात्री साडेदहाच्या सुमारास कोसळली. या भिंतीखाली सापडून एका ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. पावसात मासेमारी करण्यासाठी गेल्यावर अंगावर वीज पडून ठाकर समाजातील संतोष गुलाब खंडवे (वय 25 , रा. वेताळे, ता. खेड) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 26) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील भामा आसखेड धरण परिसरात पाईटच्या रौंधळवाडी गावात घडली.
कळंब (ता. इंदापूर) येथे अचानक आलेल्या निरा नदीच्या पुरामुळे लक्ष्मीनगरसह नदीकाठच्या भागातील 125 हून अधिक घरांना पुराचे पाणी वेढून राहिले. बारामतीच्या पश्चिम भागात अनेक ठिकाणी शेतीचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे प्रथमच मे महिन्यात निरा नदीला पूर आला आहे. भीमाशंकर, आहुपे व पाटण खोर्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. अनेक गावांमध्ये ठिकठिकाणी दरडी कोसळून वाहतूक बंद झाली आहे. बारामती शहर आणि तालुक्यात झालेल्या पावसाने मोठी दाणादाण उडाली आहे. निरा डावा कालवा फुटल्याने नुकसानीत मोठी भर पडली. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील भोरगिरी, भिवेगांव, टोकावडे, पाभे व परिसरात सोमवारी पहाटे मुसळधार पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
इंदापूर तालुक्यातून वाहणार्या निरा नदीला ढगफुटीसदृश पावसाने आलेल्या पुरामुळे नदीवरील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे सोमवारी (दि. 26) दिवसभर पाण्याखाली गेलेले दिसले. जोरदार पावसामुळे घोड नदीला तब्बल 30 वर्षांनंतर पूर आला आहे. तोरणा -राजगड खोर्यात सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. शेती पाण्याखाली बुडाली आहे.
खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. नद्या, ओढे- नाल्यांना मे महिन्यात पूर आला आहे. काढणीला आलेली बाजरी, उन्हाळी भुईमूग, भाजीपाला, फळपिके मुसळधार पावसात नष्ट झाली.
कुरवंडे 184, दौंड 114, माळीण 95, लवासा 83, निमगिरी 67, बालेवाडी 56, तळेगाव ढमढेरे 54.5, वडगावशेरी 54, बारामती 53, भोर 39.5, हडपसर 38, राजगुरुनगर 37.5, मगरपट्टा 37.5, गिरीवन 37, नारायणगाव 36.5, तळेगाव 33, डुडुळगाव 25.5, शिवाजीनगर 23, पाषाण 21, कोरेगाव पार्क 7.5, एनडीए 6.5, पुरंदर 0.5.
वडगावशेरी 41.5, पाषाण 37.2, डुडुळगाव 36.5, तळेगाव ढमढेरे 29, शिवाजीनगर 21.6, राजगुरुनगर 20.5, हवेली 19, चिंचवड 20.5, हवेली 19, तळेगाव 17, मगरपट्टा 14.5, नारायणगाव 14.5, हडपसर 12.5, निमगिरी 10, बारामती 7, लवासा 5.5, गिरीवन 4, दौंड 3.5, कोरेगाव पार्क 2.5, कुरवंडे 2.5, एनडीए 1.5.