

पुणे : राज्यात गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळीच्या धामधुमीतच मान्सून राज्यात 25 मे रोजी दाखल झाला. 26 रोजी त्याने मुंबई, पुणे काबीज करीत सोलापूरपर्यंत मजल मारली. अवघ्या दोन दिवसांत तो संपूर्ण राज्य व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, राज्यातील मुसळधार पाऊस 3 जूननंतर कमी होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने सोमवारी दिले.
राज्यात हवेचा दाब कमी असल्याने 28 ते 31 मेपर्यंत मुसळधार पाऊस सुरूच राहणार आहे. 3 जून रोजी हवेचा दाब वाढेल. त्यामुळे पाऊस कमी होईल. तेथून पुढे चार ते पाच दिवस पाऊस पूर्ण उघडेल. जमीन वाफसा येईपर्यंत पेरणी करू नये. जूनच्या पहिल्या आठवड्यातच अशी स्थिती येईल, त्यामुळे शेतकर्यांनी काळजी न करता पाऊस थांबण्याची वाट पाहावी, असे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी म्हटले आहे.
- रेड अलर्ट : रत्नागिरी (27), सिंधुदुर्ग कोल्हापूर (घाटमाथा) (27), कोल्हापूर (27), सातारा (घाटमाथा) (27).
ऑरेंज अलर्ट : रायगड (27,28), रत्नागिरी (28,29), सिंधुदुर्ग (26 ते 28), पुणे (घाट) (27), सातारा (27), परभणी (27), बीड (27), हिंगोली (27), नांदेड (27).
यलो अलर्ट : ठाणे (27,29), मुंबई (27,28), रायगड (29), रत्नागिरी (30), धुळे (27,28), नंदुरबार (27,28), जळगाव (27 ते 29), नाशिक (27), अहिल्यानगर (27), पुणे (27), पुणे (घाट) (28,29), कोल्हापूर (घाट) (28,29), सातारा (घाट) (29,30), सांगली (27), सोलापूर (27), छत्रपती संभाजीनगर (27 ते 29), जालना (27 ते 29), परभणी (28,29), हिंगोली (28,29), नांदेड (27 ते 29), लातूर (27 ते 29), अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ (27 ते 30).