पुणे; पुढारी वृत्तसेवा : पावसाच्या सरी अंगावर झेलत गणपती देखावे पाहण्यासाठी रस्त्यावर उतरलेले पुणेकर… गणपती मंडपासमोर उभे राहून फोटो आणि सेल्फी काढण्यासह रिल्ससाठी व्हिडीओ काढण्यात मग्न झालेले गणेशभक्त… अनेक दिवस ओढ दिलेला पाऊस शुक्रवारी धावून आला, त्या पावसाच्या सरींप्रमाणेच गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी गर्दीचाही पूर आला होता. शहरातील देखावे पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
दरम्यान, मंडळांमार्फत साकारण्यात आलेले भव्य तसेच जिवंत देखावे पाहण्यास पुणेकर गर्दी करीत असल्याचे चित्र शहराच्या मध्यवर्ती भागात दिसले. एकाच गणरायाची अनेक रूपे पाहण्यासाठी आणि पहिल्याच दिवसापासून सुरू झालेले मंडळांचे देखावे पाहण्यासाठी शहराच्या मध्यभागात गणेशभक्तांची गर्दी होत आहे. या वेळी सेल्फी विथ बाप्पा, रिल्ससाठी व्हिडीओ तसेच बाप्पाचे स्टेटस ठेवणारी तरुणाई विविध ठिकाणी दिसून येत होती. बाप्पाचे मोहक रूप साठवून ठेवण्यासाठी गर्दीतून अधूनमधून मोबाईलही उंचावले जात होते.
लहान मुलांना गाडीवर बसवून विविध मंडळांच्या समोर रस्त्यावरच वाहने उभी करून नागरिक देखावे पाहणे पसंत करत होते. पावसाच्या सरीतही गणेशभक्तांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. मानाच्या गणपतींच्या परिसरात पायी चालणार्या नागरिकांच्या गर्दीसोबतच बाजूच्या मंडळाचे देखावे पाहण्यासाठी वाहनांवरून फिरणार्यांचीही गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे, वाहतूक पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे पीएमपी, चारचाकी व दुचाकी वाहने जात होती.
हेही वाचा