

कात्रज(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले. मात्र, शहराच्या दक्षिण भागात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. कात्रज तलावासह पाचही पाझर तलाव तळाला गेले असून, नागरिकांतून चिंता व्यक्त केली जात आहे. कात्रज येथील नानासाहेब पेशवे जलाशय, राजीव गांधी प्राणिसंग्रहालय तलाव, गुजर-निंबाळकरवाडी येथील नवलाई दरा, भिलारेवाडी पाझर तलाव, जांभूळवाडी पाझर तलाव, कोळेवाडी पाझर तलाव जुलैअखेरीस पूर्ण क्षमतेने भरतात. मात्र, यंदा जोरदार पाऊस न झाल्याने अपेक्षित पाणीसाठा झाला नाही.
गुजर-निंबाळकरवाडी आणि भिलारेवाडी पाझर तलावांतून गाव विहिरीद्वारे पाणीपुरवठा केला जातो. कात्रज तलावातील विहिरीतून मांगडेवाडीला पाणीपुरवठा होतो. तसेच, या तलावाखालील विहिरी, बोअरवेल यांचा नागरिकांना पाण्यासाठी वापर होतो. मात्र, हे तलाव न भरल्याने नागरिकांना चिंता वाटू लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून अधूनमधून दक्षिण भागात पाऊस सुरू आहे. मात्र, या पावसाला जोर नसल्याने तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ शकली नाही. त्यामुळे नागरिकांना जोरदर पावसाची प्रतीक्षा आहे.
भिलारेवाडी पाझर तलावाखालील विहिरीद्वारे गावाला पाणीपुरवठा होतो. तसेच, लगतच्या वन्यजीवांनादेखील पाणी मिळते. एकीकडे मोठा पाऊस नाही, तर महापालिकेत समाविष्ट होऊनही सक्षम पाणीपुरवठा यंत्रणा करण्यात आली नाही. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाईची भीती निर्माण झाली आहे.
– विक्रम भिलारे, माजी सरपंच
हेही वाचा