गडहिंग्लजला वाढतोय गुन्हेगारीचा आलेख | पुढारी

गडहिंग्लजला वाढतोय गुन्हेगारीचा आलेख

गडहिंग्लज, प्रवीण आजगेकर : शांत व सुसंस्कृत म्हणून ओळख असलेल्या गडहिंग्लज तालुक्यात सध्या गुन्हेगारीची पाळेमुळे अधिक घट्ट रोवली जात आहेत. युवकांतील हाणामार्‍या आता कोयत्याने वार करून जीव घेण्यापर्यंत गेल्या असून, साहजिकच गडहिंग्लजचा गुन्हेगारी आलेख वाढतच असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी गांजा, मटका, जुगार, अवैध दारू खुलेआम सुरू असून, खबर्‍यांचे नेटवर्क गायब असल्याने घटनेपूर्वी पोलिसांना आता कशाचाही अंदाज येत नाही. याशिवाय पोलिसांचा कमी झालेला धाक हा देखील गुन्हेगारीसाठी पोषक ठरत असून, नव्या पोलिस निरीक्षकांनी तरी गुन्हेगारीवर जरब बसवावी, अशी अपेक्षा लोकांमधून होत असताना त्याबाबतही काही संकेत दिसत नाहीत.

तालुक्याला कर्नाटक हद्द लागून असून, गोवा राज्यही काही अंतरावर असल्याने या ठिकाणी अवैध दारूसह गांजा विक्रीही फोफावली आहे. अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत असून, पूर्वीसारखे पोलिसांचे नेटवर्क नसल्याने यावर अंकुश बसताना दिसत नाही. महाविद्यालयीन परिसरात पोलिसांकडून गस्तच होत नसल्याने या ठिकाणी छेडछाडीसारखे प्रकार नित्याचेच बनले आहेत. निर्भया पथक नेमके कोठे काम करते, असाही प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.

अलीकडच्या काळात कॉलेजच्या मुलांमध्ये हाणामार्‍या वाढल्या आहेत. पूर्वी गुद्द्यावर असणार्‍या मारामार्‍या आता थेट शस्त्रांवर आल्या असून, यातून आगामी काळात गंभीर प्रकरणापर्यंतचे सत्र गेल्यास आश्चर्य वाटायला नको. पोलिसांच्या धाकामुळे पूर्वी युवकांमधील गुन्हेगारी कमी असायची. आता मात्र पोलिसांचा धाकच राहिला नसल्याने युवकांमधील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.

देशीची कमी मात्र विदेशीची हमी

गडहिंग्लज हा कर्नाटक व गोवा सीमेलगतचा तालुका असल्याने या ठिकाणी देशी दारुची तस्करी कमी असली तरी विदेशी दारूची तस्करी मात्र मोठ्या प्रमाणात आहे. गावागावांत या दारु विक्रीचे केंद्र बिनधास्तपणे सुरु असून, याला वरदहस्त कुणाचा, याचा शोध आता पोलिसांना स्वतःपासूनच घ्यावा लागणार आहे.

Back to top button