पुणे: जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने धरणसाठ्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 26 धरणांपैकी तब्बल 17 धरणांतून पाणी सोडण्यात आले आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. जिल्ह्यातील 55 महसूल मंडळात 65 मिलिमीटर पाऊस झाला आहे.
दौंड तालुक्यातील बोरीपार्धीत 123 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. 15 सप्टेंबर रोजी पहाटे 3 वाजता थेऊरमधील रुकेवस्ती जिल्हा परिषद शाळा परिसरात पाणी साचून 100 ते 150 नागरिक अडकल्याची प्राथमिक माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. (Latest Pune News)
यावर तातडीने स्थानिक नागरिक, प्रशासन आणि आपदा मित्र यांच्या मदतीने मदतकार्य सुरू झाले. पीएमआरडीएच्या पीडीआरएफ जवानांनी रात्री 3 वाजून 30 मिनिटांनी घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू केले. त्याचवेळी एनडीआरएफ टीमलाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले.
एनडीआरएफचे जवान पहाटे 5 वाजता घटनास्थळी दाखल झाले आणि 50 ते 55 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. काही नागरिकांना टेरेसवर थांबविण्यात आले होते. या भागातील ओढ्यावर अतिक्रमण झाल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह थांबून पूरस्थिती निर्माण झाली होती. अखेर रस्ता फोडून पाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सणसरमध्ये 480 नागरिकांचे स्थलांतर
इंदापूर तालुक्यातील सणसरमध्ये देखील ओढ्याचे पाणी अनेक घरांमध्ये गेले होते. त्यामुळे 120 कुटुंबांना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. अंदाजे 480 नागरिकांना छत्रपती हायस्कूल, सणसर येथे तात्पुरता आसरा देण्यात आला आहे.
हवामान विभागाचा अलर्ट
मुंबई हवामान वेधशाळेने पुणे जिल्ह्यासाठी 15 सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे आणखी पावसाची शक्यता असल्याने प्रशासन हायअलर्टवर आहे.
जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी
पुणे जिल्ह्यात सरासरी जून ते सप्टेंबर महिन्यात पुणे साधारण 862 मि. मी. पाऊस पडतो, तर जून ते ऑक्टोबरदरम्यान 940 मि. मी. सरासरी पाऊस पडतो. जूनपासून आजपर्यंत एकूण 745.2 मि. मी. पाऊस झाला असून तो सरासरीच्या 86.5 टक्के आहे.सद्यःस्थिती सध्या पावसाचा जोर ओसरल्याने पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक नागरिक परत त्यांच्या घरी परतले आहेत.