

Navratri rain in Maharashtra 2025
पुणे: बंगालच्या उपसागरात सोमवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्यामुळे राज्यात पाऊस वाढणार आहे. याचा परिणाम म्हणून शुक्रवार (दि. 26) ते रविवार (दि. 28) दरम्यान बहुतांश भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरावर सोमवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्याच्या प्रभावामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पाऊस सुरू आहे. उद्या, बुधवारी (दि. 24) आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. (Latest Pune News)
त्यामुळे 26 ते 28 सप्टेंबरदरम्यान राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, मान्सूनचा परतीचा प्रवास गुजरातपर्यंत आला असून, तेथे गत तीन दिवसांपासून पाऊस होत आहे. तेथून तो महाराष्ट्रात कधीही येऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण नवरात्रीत राज्यात पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे.
मान्सूनचा परतीचा प्रवास जोरदार मान्सून परतीच्या प्रवासात यंदा खूप जास्त पाऊस देत निघाला आहे. पूर्व राजस्थान ते गुजरातपर्यंत येण्यास दहा दिवसांचा कालावधी लागला. या प्रवासात मान्सून धो-धो बरसत आहे. सोमवारी मान्सून गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या काही भागांमधून परतला आहे.
असे आहेत इशारे (तारीख)
कोकण: मुसळधार (23, 24), अतिवृष्टी (25 ते 27)
मध्य महाराष्ट्र: मुसळधार (26 ते 28)
मराठवाडा: मुसळधार (23, 26, 27)
विदर्भ: मुसळधार (24), अतिमुसळधार (25 ते 28)