

ओतूर : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील जुन्नर व अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या सरहद्दीवरील खामुंडी ते बदगी बेलापूर मार्गावरील बदगीच्या घाटात शुक्रवारी (दि. १९) अज्ञाताने बिबट्याची चार बछडे बॉक्समध्ये भरून तो बेवारसपणे आणून ठेवला होता. बछडे अचानक हरविल्यामुळे ही बिबट मादी सैरभैर झाली असून त्या मादीने दुचाकीवरून घरी परतणाऱ्या पप्पू बाळू दुधवडे (वय ३६, रा. म्हसंवडी, ता. अकोले) याचेवर शनिवारी (दि. २०) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हल्ला केला. यामध्ये पप्पू दुधवडे याचा मृत्यू झाला.
उत्तर पुणे जिल्ह्याचे टोक व अहिल्यानगर जिल्ह्याचे दक्षिण टोक या मध्यावर जुन्नर आणि अकोले तालुका वसलेला आहे. बदगीचा घाट हा दोन्ही तालुक्याच्या हद्दीत आहे. याच घाटात हे बडछे एका महाभागाने बॉक्समध्ये भरून सोडली होती. त्यामुळे या बिबट मादीचा दोन दिवसांपासून सुरू असलेला आक्रोश अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष बघितला असून बदगी ते बेलापूर रस्त्यावरील भिसे वस्ती नजीक दुधवडे यांचेवर हल्ला करणारी बिबट मादी ही तीच असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हल्ली ओतूर आणि परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातल्याचे दिसत असून रविवारी (दि. २१) रात्री अहिनवेवाडी फाट्यानजिकच्या शेखर वसंतराव डुंबरे यांचे बंगल्यासमोरून त्यांचा पाळलेला कुत्रा बिबट्याने हल्ला करून घेऊन गेला. यापूर्वी ओतूर गावठाणात देवगल्लीतील वैद्य बोळात शिरून प्रशांत लक्ष्मण दांगट यांचा एक कुत्रा ठार करून दुसऱ्या कुत्र्यासोबत पोबारा केला आहे. रोहकडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान मिळाले असून रविवारी रात्री श्री संत गाडगे महाराज विद्यालयाच्या पटांगणात बिबट्याने फेरफटका मारल्याचे संस्थेचे कर्मचारी सांगत आहेत. एकूणच बिबट्यांची मोठी दहशत ओतूर आणि परिसरात दिसून येत आहे.
दरम्यान खामुंडी ग्रामस्थानी बिबट बछड्यांबाबत ओतूर वनविभागाला भ्रमणध्वनीवरून माहिती दिली असता वनपाल सारिका बुट्टे, जुन्नरचे आरएफओ प्रदीप चव्हाण हे घटनास्थळी तात्काळ हजर झाले. त्यांनी ही बछडे ताब्यात घेऊन माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात दाखल केली आहेत. ही बछडे केवळ १५ दिवसांपूर्वी जन्मलेली आहेत.