Khadakvasla Dam Water Storage: पानशेत-वरसगाव खोऱ्यात हलका पाऊस; साखळीत ९९.७४ टक्के पाणीसाठा
खडकवासला : तुरळक पावसाचा अपवाद वगळता चारही धरणमाथ्यांवर सोमवारी (दि. २२) पावसाने उघडीप दिली. असे असले तरी रायगड जिल्ह्याच्या हद्दीवरील घाटमाथ्यासह पानशेत-वरसगाव खोऱ्यात दोन दिवसांपासून रिमझिम सुरू आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग सुरूच आहे.
धरणसाखळीत सोमवारी (दि. २२) सायंकाळी पाच वाजता २९.०७ टीएमसी म्हणजे ९९.७४ टक्के पाणीसाठा झाला होता. दरम्यान, पावसाचे प्रमाण कमी झाल्याने खडकवासलातून मुठा नदीपात्रातील विसर्ग २ हजार ९९६ वरून १ हजार ६८८ क्सुसेकपर्यंत कमी करण्यात आला.
वरसगाव धरणातून ४५० व टेमघरमधून ३०० क्सुसेकने पाणी खडकवासलात सोडले जात आहे. सोमवारी दिवसभरात खडकवासला येथे केवळ १ मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर धरणमाथ्यावर पावसाची नोंद झाली नाही.
खडकवासला जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन भदाणे म्हणाले की, धरणसाखळी शंभर टक्के भरली आहे. धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे जादा पाणी मुठा नदीत सोडण्यात येत आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी-जादा झाल्यास मुठा नदीपात्रात कमी-जादा प्रमाणात पाणी सोडावे लागत आहे. त्यामुळे नदी पात्रात कोणी उतरू नये.
खडकवासला धरणसाखळी एकूण पाणी साठवण क्षमता : २९.१५ टीएमसी
सोमवारचा पाणीसाठा : २९.०७ टीएमसी : ९९.७४ टक्के
धरण : पाणीसाठा (टीएमसी) : टक्केवारी
खडकवासला १.९० : ९६.१७
पानशेत १०.६५ : १००
वरसगाव १२.८२ : १००
टेमघर ३ .७१ : १००
