Rain Update: पुण्यासह राज्यभरात धो-धो पाऊस; अनेक ठिकाणी झाडे पडली

मडगाव-मुंबई जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेससह सहा गाड्या थांबविल्या
Rain Update
पुण्यासह राज्यभरात धो-धो पाऊस; अनेक ठिकाणी झाडे पडलीPudhari Photo
Published on
Updated on

पुणे: राज्यभरात बहुतांश ठिकाणी मंगळवारी धो-धो पाऊस झाला. पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणात जोरदार पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, मुळशीसह इतर तालुक्यांना वादळी पावसाचा फटका, पिंपरी चिंचवड परिसरातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

यामुळे वृक्ष कोसळण्यासह किरकोळ पडझडीच्या घटना घडल्या. अनेक ठिकाणी पाणी साचले होते. शहरातही पावसाने जोरदार बॅटिंग केली. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुककोंडी झाल्याचे दिसून आले. (Latest Pune News)

Rain Update
उजनीत वडाप जाळीद्वारे बेकायदा मासेमारी; कारवाईकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

सातार्‍यात बहुतांश ठिकाणी मंगळवारी वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. कास-यवतेश्वर रस्त्यावरील पॉवर हाऊस जवळ मोबाईल टॉवर कोसळला.

या टॉवरखाली सापडलेल्या चार गाड्यांचे मोठे नुकसान झाले तर दोनजण जखमी झाले. माण तालुक्यात अनेक ठिकाणी शेताचे बांध फुटले तर काही गावांत डाळिंब, आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले. कांद्याच्या ऐरणी भिजल्या, त्यातील कांदेही वाहून गेले.

सातारा शहरातील मल्हारपेठेत व बोगदा ते शेंद्रे रस्त्यावर वादळी वार्‍यामुळे झाड उन्मळून पडले. झाडाखाली रस्त्याकडेला लावलेल्या दुचाकी सापडल्या; तर दुकानांचे पत्रेही उचकटले. झाडाच्या फांद्या रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती. सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला.

Rain Update
Pune Hoarding Collapse: पुण्याला पावसाचा तडाखा; वाघोलीत होर्डींग कोसळले

कोकणात रत्नागिरीसह परिसरात मान्सूनपूर्व पावसाने मंगळवारी अक्षरश: झोडपून काढले. या पावसामुळे आंबा पिकाचे शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. चिपळूणमध्ये एका घरावर वीज पडून लाखोंचे नुकसान झाले आहे. यामध्ये घरातील सर्व विद्युत उपकरणे जळून निकामी झाली.

दरड कोसळून कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कोकण रेल्वे मार्गावर विलवडे तसेच वेरवली स्थानका दरम्यान रेल्वे रुळांवर दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मंगळवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेससह जवळपास सहा एक्स्प्रेस गाड्यांना ब्रेक लागला आहे.

मंगळवारी दुपारपासून रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. अशातच कोकण रेल्वे मार्गावर विलवडे ते वेरवली दरम्यान मांडवकरवाडी येथील रेल्वे बोगद्यासमोर दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक थांबवावी लागली.

मडगांव ते मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस दुर्घटनाग्रस्त भागातून निघून गेल्यानंतर दरड कोसळली. सायंकाळी पावणेसहा वा.च्या सुमारास दरड कोसळल्याचे लक्षात येताच या मार्गावरून धावणार्‍या गाड्या त्या त्या ठिकाणी थांबवण्यात आल्या.

दरड कोसल्याने थांबवण्यात आलेल्या गाड्यांमध्ये मडगांव, मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस, मडगांव, मुंबई तेजस एक्स्प्रेस, एर्नाकुलम पुणे, सुपरफास्ट एक्स्प्रेस, मडगांव, मुंबई कोकण कन्या एक्स्प्रेस तसेच मुंबईकडे जाणारी मत्स्यगंधा मडगांव, मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस या मडगांव, मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस गाड्या खारेपाटण ते मडगांव दरम्यान विविध स्तानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या.

कोल्हापुरात झोडपले

कोल्हापूर जिल्ह्यात सायंकाळी साडेचारच्या सुमारास वळिवाने झोडपून काढले. जोरदार सरींमुळे शहर तुंबले होते. शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, महाद्वाररोड, मंगळवार पेठ, हॉकी स्टेडियम परिसरातील भागांना अक्षरशः तळ्याचे स्वरुप आले होते. हे सारे चित्र पाहता मनपाने नालेसफाई, गटर सफाईसह मान्सूपूर्व कामांचे ढोल बडवत करण्यात आलेल्या फोटो सेशनचा बुरखा फाटला आहे.

सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस

शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात मंगळवारी दुपारपासून वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. दुपारपासून सलग पाऊस सुरू राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. काही ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली.

मिरज, पलूस, शिराळा, तासगाव या तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. वादळी वार्‍यामुळे ठिकठिकाणी रस्त्यावर झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. दुपारपासून सलग पाऊस सुरू राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news