

Pune Hoarding Collapse
पुणे : मे महिन्यातच पुण्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे वाघोलीतील सणसवाडी येथे हार्डिंग कोसळले असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
पुण्यासह महाराष्ट्रात सध्या पावसाने झोडपले आहे. मान्सूनचे आगमन अद्याप झाले नसले तरी मेच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पाऊस पडत आहे. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी पुण्याला पावसाने झोडपले. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसानं हजेरी लावली. पुणे - अहिल्यानगर रस्त्यावर वाघोलीजवळ होर्डिंग कोसळले. यात रस्त्यालगत पार्क केलेल्या सात ते आठ दुचाकी होर्डिंगखाली अडकल्या. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. शिरुर तालुक्यात ही घटना घडली असून रहदारी असलेल्या मुख्य रस्त्यावरच ही घटना घडल्याने चिंता व्यक्त होत आहे.
दुपारपासून पुण्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पाऊस
सोशल मीडियावर पुण्यातील विविध भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी पावसाचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत. मान्सूनच्या आगमानाला अद्याप वेळ असला तरी भर मे महिन्यातच मान्सूनचा अनुभव येत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. पावसामुळे कामावरुन घरी परतणाऱ्या पुणेकरांना आता वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
25 मेपर्यंत पावसाचा इशारा
हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेच्या अधिकृत संकेतस्थळावर पावसाबाबत अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील पाच दिवस म्हणजेच 24 मेपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळण्याचा अंदाज असून 25 – 26 मेलाही तुरळक पाऊस हजेरी लावेल, असं वेधशाळेने म्हटलंय.