Elections 2024: विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून मतदान केंद्राबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. या बंदोबस्ताचा आढावा मागील दोन दिवसांपासून घेतला जात आहे.
बंदोबस्तासाठी 11 पोलीस उपायुक्त, 22 सहायक पोलिस आयुक्त, 64 पोलीस निरीक्षक, 311 सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षकांसह 5 हजार 255 पोलीस कर्मचारी, 1870 होमगार्ड तैनात असणार आहेत. यासोबतच बॉम्बशोधक व नाशक पथक, शीघ्र कृती दल आणि क्रेंदीय निमलष्करी सशस्त्र दल कार्यरत असणार आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले. आचारसंहिता लागल्यापासून पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी आणि गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली होती.
गुन्हे शाखेची विशेष पथके तयार करून बेकायदा दारू, गुटखा, जुगार अड्ड्यांवर छापे टाकण्याबरोबरच बेकायदा शस्त्रेही जप्त केली आहेत. गुन्हेगारांवर विविध प्रकारे प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. आता मतदानाच्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्ताची तयारी सुरू केली आहे. शहरात 716 इमारतींमध्ये मतदान केंद्रे असणार आहेत.
त्यांची विभागणी 168 सेक्टरमध्ये करण्यात आली आहे. तेथे सहायक पोलीस निरीक्षक किंवा उपनिरीक्षक असतील. या केंद्रांवर कॉल मिळताच दोनच मिनिटांत गस्ती पथकाची वाहने पोचहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबत 31 ठिकाणीही नाकाबंदी करण्यात येणार आहे.
पोलीस उपायुक्त आणि सहायक आयुक्तांची फिरती पथके असणार आहेत. तसेच सीसीटीव्हीद्वारे लक्षही ठेवले जाणार आहे. गुन्हे शाखेची 40 पथके, त्यामध्ये 300 कर्मचारी गोपनीयरीत्या कार्यरत असणार आहेत. तसेच पोलिसांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या 74 इमारतींवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
गुन्हे शाखेच्या 40 टीम कार्यरत
शहरातील 716 इमारतींमध्ये 3 हजार 331 बूथ आहेत, तर 58 इमारतींमध्ये 10 पेक्षा जास्त बूथ आहेत. त्यापैकी एक संवेदनशील बूथ आहे, तर 74 पोलिस संवेदनशील इमारती आहेत. सर्वांची 138 सेक्टरमध्ये विभागणी केली आहे. तसेच दोन ते तीन मिनिटांत पेट्रोलिंग व्हॅन पोहचू शकते असे नियोजन केले आहे. गुन्हे शाखा 40 टीम कार्यरत असून, त्यामध्ये 300 कर्मचारी तैनात आहेत. क्यूआरटी आणि घातपात पथके प्रत्येकी 6 पथक कार्यरत आहेत.
पोलिस बंदोबस्त दृष्टिक्षेपात डीसीपी-11, एसीपी- 22, पोलीस निरीक्षक-64, एपीआय/पीएसआय-311, पोलीस अमलदार-5 हजार 255, होमगार्ड- 1 हजार 870, सशस्त्र केंदीय दले- 15, एसआरपीएफ कंपनी -2.
रात्री पोलिसांची विशेष गस्त
मतदारांना मतदानाच्या दोन दिवस अगोदर आमिष दाखवले जाते, तसेच पैशांचे वाटपही केले जाते. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी रात्रीची विशेष गस्त आजपासून (दि. 19 नोव्हेंबर) कार्यरत केली आहे. तसेच सकाळचीही गस्त असणार आहे. वारजे, संगमवाडी, नागपूर चाळ, जनता वसाहत, नाना पेठ अशा संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.