कोल्हापूर ः आपल्या दहा वर्षांच्या आमदार पदाच्या कालावधीत कोल्हापूर उत्तरच्या विकासाला सर्वांगीण गती दिली. मात्र गेल्या पाच वर्षांत ही गती मंदावली. एवढेच नव्हे तर विकासकामांना खीळ घालण्याचे प्रयत्न काहीवेळा झाले. या राजकीय विरोधकांना मात देण्याची आणि कोल्हापूर उत्तरच्या विकासाला गती देण्याची हिंमत आणि ताकद माझ्यातच आहे. जे दहा वर्षांत करून दाखविले ते आता येत्या पाच वर्षांत करून दाखवू, असा ठाम विश्वास महायुती शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तमाम बहिणी आपल्या मागे ठामपणे उभ्या आहेत. त्याचप्रमाणे विकासकामांना गती देण्यासाठी जनताच आपल्या मागे ठामपणे उभी असल्याचे क्षीरसागर यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
सध्या एआयचे युग आहे. त्याच्या आधारे फोटो आणि व्हिडीओमध्ये वाट्टेल ते फेरफार करता येतात. त्याचाच आधार घेत काही समाजकंटक आणि विरोधक माझ्या बदनामीचे षड्यंत्र रचत आहेत. जुने व्हिडीओ काढून चुकीच्या पद्धतीने एडिट करून ते व्हिडीओ व्हायरल करून माझ्या बदनामीचे षड्यंत्र विरोधकांनी रचले आहे. विरोधकांच्याकडे विकासात्मक बोलण्यासारखे काहीच नसल्याने जनतेत संभ—म निर्माण करण्यासाठी असा प्रकार करत आहेत. त्या व्हिडीओवर मतदारांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही क्षीरसागर यांनी केले.
कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नसल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे. श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. तसेच पर्यटकही मोठ्या प्रमाणात येत आहेत. वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी शहरात उड्डाणपूल बांधणे, भुयारी मार्ग करणे, पाथ वे करण्यास प्राधान्य देणार आहे. त्याबरोबरच पार्किंगची सुविधाही निर्माण केली जाईल.
कोल्हापूर, सांगली पूर नियंत्रणासाठी 3200 कोटी
कोल्हापुरात कन्व्हेंशन सेंटर : 277 कोटी
कोल्हापुरातील ड्रेनेज लाईनसाठी : 291 कोटी
कोल्हापुरात रस्त्यांसाठी : 100 कोटी
ऐतिहासिक रंकाळ्यासाठी : 25 कोटी
केशवराव भोसले नाट्यगृह : 25 कोटी
अंतर्गत मूलभूत सुविधांसाठी : 25 कोटी
राजर्षी शाहू समाधिस्थळ : 10 कोटी
पंचगंगा नदी घाट सुशोभिकरण : 6 कोटी
गांधी मैदान क्रॉस ड्रेनसाठी : 5 कोटी
बॉटनिकल गार्डनसाठी : 4.80 कोटी
कुस्ती संकुल उभारणे : 3 कोटी
अंबाबाई मंदिर परिसरात म्युझिकल हेरिटेज स्ट्रीट लाईट : 2.50 कोटी
विविध गार्डनमध्ये ओपन जिम व व्यायाम साहित्य : 5 कोटी
गरजू रुग्णांना मदत : 12 कोटी
रंकाळ्यात म्युझिकल फाऊंटन : 5 कोटी