Pune: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समन्स बजावत सोमवारी (दि. 18) न्यायालयात हजर राहण्याचे आदेश काढण्यात आले होते.
राहुल गांधी हे दौर्यामध्ये व्यस्त असल्याने न्यायालयात हजर राहू शकले नसल्याचे गांधी यांच्या वकिलांकडून सांगण्यात आले. त्यानंतर, न्यायालयाने गांधी यांच्या वकिलांकडून हमीपत्र घेत येत्या 2 डिसेंबर रोजी हजर रहावे, असे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या या विशेष न्यायालयाने दिले आहे.
राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्याचा दाखला देत सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे.
या प्रकरणात न्यायालयात हजर होण्याबाबत गांधी यांना बजावलेले समन्स चुकीच्या न्यायालयात गेल्याने परत आले होते. हे समन्स दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयात गेले होते. मात्र, राहुल गांधी यांचे निवासस्थान तीस हजारी जिल्हा न्यायालयाच्या हद्दीत असल्याने समन्स बजावण्याची कार्यवाही करण्यात आली.
दरम्यान, नव्याने पाठवलेले समन्स गांधी यांचे घरी पोहोचल्याबाबतचा टपाल विभागाचे कागदपत्रही फिर्यादी यांचे वकील अॅड. संग्राम कोल्हटकर यांनी न्यायालयात हजर केले. मात्र समन्स मिळूनही राहुल गांधी न्यायालयासमोर हजर झालेले नाहीत. म्हणून राहुल गांधी यांना अजामीनपात्र वॉरंट काढावे असा अर्ज अॅड. कोल्हटकर यांनी न्यायालयात सादर केला. त्यावर, राहुल गांधी यांच्या वतीने अॅड. मिलिंद पवार यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला.
देशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या ते देशभर दौर्यावर आहेत. न्यायालयाचे समन्स त्यांच्या कार्यालयात मिळाले आहेत, परंतु ते दौर्यावर व्यस्त असल्याने आज न्यायालयात हजर राहू शकत नाहीत, असा अर्ज मिलिंद दत्तात्रय पवार यांनी न्यायालयात केला. त्यानंतर, गांधी हे 2 डिसेंबरला न्यायालयात हजर होतील, असे हमीपत्र न्यायालयाने अॅड. पवार यांच्याकडून लिहून घेतले.