

वाडा: भिमाशंकर आणि भोरगिरी परिसरात रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण परिसरात हाहाकार माजला आहे. डोंगरकड्यांवरून येणारे ओढे आणि नाले दुथडी भरून वाहत असल्यामुळे नदी-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे.
पहिल्याच पावसात भिमानदीला पूर आला असून, नदीवरील बंधारे आणि छोटे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. काही घरांमध्ये देखील पाणी शिरले असून स्थानिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. (Latest Pune News)
स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की, भिमानदीवरील बंधाऱ्यांचे डाफे वेळेवर न उघडल्यामुळे पाणी अनेक गावांमध्ये शिरले. परिणामी, शेतीसह घरांचे आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
भात खाचरांमध्ये पाणी साचल्याने भातासाठी तयार केलेली भात खाचरं पूर्णपणे नष्ट झाले आहे. पाण्याधे खाचरे वाहुन गेली आहेत. अनेक शेतकऱ्यांची शेतातील घरे आणि जनावरांचे गोठेही पाण्याखाली गेले. पशुधन हताहत झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत.
रात्रभर सुरु असलेला पाऊस सकाळी थांबला असला तरी त्याचे परिणाम भीषण आहेत. सध्या हवामान स्थिर असून, स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
रात्री चार चे सुमारास पावसाचे प्रमाण वाढल्याने ज्ञानेश्वर बाळु आसवले, कविता ज्ञानेश्वर आसवले यांचे घरात पाणी घुसले होते. घरात अंदाजे 5 फुटा पर्यंत पाणी साचल्याने घरातील धान्य, जीवनावश्यक वस्तु भिजुन मोठे नुकसान झाले आहे, घरातील कोंबड्या 20 ते 25 कोंबड्या वाहुन गेल्या व पाच ते दहा कोंबड्या मृत झाल्या पशुधन पाण्याखाली होते प्रसंगावधान राखत मालकांनी जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवले. नामदेव बाळु आसवले यांची कांद्याची आरण,पाईप जनावरांचा चारा वाहून गेला
बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतकरी रामदास मुऱ्हे, यांचे शेत वाहुन गेले भोमाळे गावचे हद्दीतील केटी बंधारा ढापे न काढल्याने बंधारा तुटला असुन शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पुढील काही दिवस हवामानात सुधारणा होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असली, तरी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिकृत पंचनामे सुरू असून, नुकसानभरपाईसाठी शासकीय मदतीची मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.