

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असताना लोहगाव परिसरात सासरच्या जाचाला कंटाळून एका 23 वर्षीय विवाहितेने झुरळ मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. पतीची गाडीची मागणी, तर सासूकडून ‘पांढर्या पायाची’ म्हणून होणारे टोमणे आणि दिराकडून शिवीगाळ, यामुळे पीडितेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी पती अजय पवार, सासू कमल पवार आणि दीर मनोज पवार (सर्व रा. संतनगर, लोहगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 23 वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे लग्न अजयसोबत 22 मे 2022 रोजी झाले होते. लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांनी अजयने घरगुती कारणांवरून पत्नीला शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली.
यानंतर सासू कमल पवार हिने देखील तिला, ‘तू माहेरहून काय आणले आहेस? तुझ्या आई-वडिलांना काही मिळत नाही, तुमची काही लायकी नाही,’ असे टोमणे मारण्यास सुरुवात केली. नवर्याने विवाहितेला ‘मी तुझ्याशी टाइमपास केला, आता तू मेली तरी चालेल. मला पैशाची गरज आहे, मला चारचाकी गाडी घेऊन देण्यास तुझ्या बापाला सांग,’ अशी मागणी केली.
पीडितेने गाडी देण्यास नकार दिल्यावर, नवर्याने तिचा गळा दाबून पुन्हा मारहाण केली. दीर मनोजही तिला शिवीगाळ करीत असे. 21 मे रोजी विवाहितेच्या सासूने, ‘पहिल्या सुनेलाही घराबाहेर काढले तसेच तुलाही बाहेर काढीन,’ अशी धमकी दिली.
शिवाय ‘तू पांढर्या पायाची आहेस, तुझी नजर चांगली नाही, तू घरात आल्यापासून शांतता नाही,’ असे म्हणत तिला हिणवले. हा त्रास असह्य झाल्याने विवाहितेने 22 मे रोजी झुरळ मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर विवाहितेने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. पोलिस हवालदार नीलेश साळवे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.