मुंढवा: खराडी परिसरात मुख्य व अंतर्गत रस्त्याच्ंया बाजूने विद्युतवाहिनीसह विविध केबल टाकण्याचे काम सुरू आहे. यामध्ये काही कामे अपूर्णावस्थेत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. महापालिका प्रशासनाने ही कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
परिसरातील रिलायन्स मॉल ते नदीपात्रापर्यंत मुख्य रस्त्याच्या डाव्या बाजूला विद्युत केबल टाकण्याचे काम मागील काही महिन्यांपासून अपूर्णावस्थेत आहे. बसथांब्यापासून काही अंतरावरच विद्युत केबलचे जाळे रस्त्यावरच टाकण्यात आले आहे. (Latest Pune News)
या कामाचा राडारोडा रस्त्यावर पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. केबल टाकण्यासाठी खोदण्यात आलेला रस्ताही पुन्हा पूर्ववत केला नसल्याने दुचाकी वाहने घसरून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
खराडीतील मुख्य रस्त्याच्या बाजूला विद्युत केबल टाकण्याचे काम अपूर्णावस्थेत असल्याने नागरिकांना वर्दळीसाठी अडथळा होत आहे. पालिका प्रशासनाने हे काम तातडीने मार्गी लावणे आवश्यक आहे.
- दीपक साळवे, सामाजिक कार्यकर्ते, थिटे वस्ती, खराडी
या रस्त्यावर एका कंपनीसाठी विद्युत वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. काही तांत्रिक कारणांमुळे हे काम थांबले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत. हे काम मार्गी लागल्यावर खोदलेल्या रस्त्याच्या ठिकाणी तत्काळ डांबरीकरण करणार आहोत.
- रूपेश वाघ, कनिष्ठ अभियंता, नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय