

दीपेश सुराणा
पिंपरी(पुणे) : वातावरणातील बदलामुळे आणि पावसाळा सुरू झाल्याने डेंग्यूच्या संशयित रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरात संशयित रुग्णांच्या संख्येत चौपट वाढ झाली आहे. मे महिन्यात डेंग्यूचे 100 संशयित रुग्ण आढळले असताना जूनमध्ये जवळपास 472 संशयित रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, वैद्यकीय विभागाकडील आकडेवारीनुसार अद्याप एकाही रुग्णाला लागण झालेली नाही. तथापि, हिवतापाची लागण झालेले 4 रुग्ण जूनमध्ये आढळून आले आहेत.
चिकूनगुणियाची साथ सध्या नियंत्रणात आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात डेंग्यूचे प्रत्येकी 2 संशयित रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर मार्च, एप्रिल, मे आणि जून अशा चार महिन्यांमध्ये मात्र एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
जून महिन्याच्या मध्यापर्यंत पाऊस पडला नव्हता. महिन्याच्या अखेरीस पावसाला सुरुवात झाली. सध्या गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. दिवसभरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. वातावरण बदलामुळे डेंग्यूच्या संशयित रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
हिवताप हा आजार एनॉफिलस तर, डेंग्यू आणि चिकुनगुणिया हे आजार पसरविण्यासाठी एडिस इजिप्ताय हे डास कारणीभूत ठरतात. त्यामुळे या आजारांना अटकाव करण्यासाठी एनॉफिलस व एडिस डासांच्या उत्पत्तीवर आळा घालणे गरजेचे आहे.
मार्च आणि एप्रिल महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात होती. मार्चमध्ये 51 तर, एप्रिल महिन्यात 88 संशयित रुग्ण आढळले होते. त्या तुलनेत मे महिन्यात मात्र संशयित रुग्ण संख्येत वाढ झाली. मे महिन्यामध्ये 100 संशयित रुग्ण आढळून आले. तर, जून महिन्यात या रुग्णसंख्येमध्ये चौपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. सध्या डेंग्यूचे 472 संशयित रुग्ण आढळले आहेत.
हिवतापाची (मलेरिया) फेब्रुवारी महिन्यात एका रुग्णाला लागण झाली होती. तर, मे महिन्यात हिवतापाचे 3 रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये जून महिन्यात एका रुग्णसंख्येने वाढ झाली आहे. जूनमध्ये एकूण 4 रुग्णांना हिवतापाची लागण झाल्याची नोंद आहे.
हेही वाचा