पुणे : हवाई दलाच्या जागेत पुन्हा अतिक्रमणे | पुढारी

पुणे : हवाई दलाच्या जागेत पुन्हा अतिक्रमणे

पुणे : पुढारी वृत्तसेवा: नगर रोडवरील फॉरेस्ट पार्क या हवाई दलाच्या संरक्षित भागात पुन्हा अवैध बंगल्यांच्या बांधकामासह सिमेंट स्लिपरच्या साहाय्याने संरक्षक भिंत बांधण्याचा उद्योग वर्षभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू झाला आहे. ऐन पावसाळ्यात संरक्षक भिंत झर्‍यावरच उभी केली जात असल्याने येथील झरे फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
टीम ‘पुढारी’ने केली पुन्हा पाहणी..
या भागात पुन्हा अवैध बांधकाम सुरू झाल्याचे समजताच टीम ‘पुढारी’ने त्या भागात जाऊन पाहणी केली असता, तेथे एका बंगल्याचे बांधकाम होत असल्याचे दिसले. तसेच संपूर्ण परिसरात सिमेंट स्लिपरने संरक्षक भिंत बांधणे सुरू आहे. हे काम जमिनीखालच्या जिवंत झर्‍यावरच सुरू असल्याने तेथे पावसाळ्यात धोका निर्माण झाला आहे.
दिवंगत खा. बापट यांनी केली होती चौकशी
वर्षभरापूर्वी या भागात होत असलेल्या अतिक्रमणांच्या दै. ‘पुढारी’तील वृत्ताची दखल घेत दिवंगत खासदार गिरीश बापट
यांनी या प्रकरणाची चौकशी केली. या भागाची पाहणी करून संरक्षण विभाग व विमानतळ प्राधिकरणालाही अतिक्रमणाची माहिती दिली होती. महापालिकेचे तत्कालीन अधीक्षक अभियंता सुधीर कदम यांनी मोठी कारवाई करीत सर्व अवैध बांधकमांवर बुलडोझर फिरवला होता. त्यानंतर या भागात वर्षभर अवैध बांधकामे करणारांचे धाबे दणाणले व सर्व कामे ठप्प  झाली होती.
 या भागातील अतिक्रमणांवर मागील वर्षी मोठी कारवाई केली होती. आता दै. ‘पुढारी’च्या माध्यमातूनच पुन्हा अतिक्रमणे होत असल्याचे समजले. तेथे आता वेगळ्या प्रकारची कारवाई करावी लागेल. त्यात हवाई दलाच्या मदतीची गरज आहे. या भागाला भेट देऊन मी तत्काळ कारवाई करतो.
                                                             – रोहिदास चव्हाण, कार्यकारी अभियंता, महापालिका, पुणे 

Back to top button