पुणे : बँकेतील ग्राहकांना लुटणारी हरियाणाची टोळी जेरबंद

पुणे : बँकेतील ग्राहकांना लुटणारी हरियाणाची टोळी जेरबंद

पुणे; पुढारी वृत्तसेवा : बँकेत कॅश भरण्यासाठी येणार्‍या नागरिकांचा विश्वास मिळवून चलाखीने रोकड लुटणार्‍या हरियाणातील तीन जणांच्या टोळीला लष्कर पोलिसांच्या पथकाने बेड्या ठोकल्या. आरोपींनी संगनमताने राज्यातील विविध शहरासह परराज्यात देखील अशाप्रकारचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्याकडून 19 गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यांनी अशा पद्धतीने 49 लाखांची लूट केली आहे. दीपककुमार ओमप्रकाश मेहंनीपत (वय 47, रा. हरीयाणा), सुनिल रामप्रसाद गर्ग (वय 37, रा. पानीपत, हरियाणा), सुरजकुमार ओमप्रकाश मेहंगी (वय 29, रा. हरियाणा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. काही दिवसांपूर्वी कॅम्प भागात पैसे काढण्यासाठी आलेल्या एका व्यावसायिकाची अर्थिक फसवणूक झाली होती. फिर्यादी व्यावसायिक असून त्यांनी बँकेतून तीन लाख रुपये काढले. त्यावेळी आरोपी दिपककुमारने आपण बँकेचे कर्मचारी असल्याचे भासवून फिर्यादींशी संवाद सुरू केला. त्यानंतर तुमच्या एका बंडलमध्ये कमी नोटा असल्याचे सांगून त्या बदलून देतो, असे सांगितले. त्याच्यावर फिर्यादीने विश्वास ठेवला.

पण काही वेळातच तो तेथून पसार झाला. लष्कर पोलिसांच्या पथकाने त्याला साथीदार सुनिल याच्यासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनूसार सुरजकुमार यालाही ताब्यात घेण्यात आले. त्यांनी गुजरात आणि मध्यप्रदेशातही अशाप्रकारे लुबाडणूक केली आहे. लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे निरीक्षक प्रियंका शेळके, सहायक पोलिस निरीक्षक शितलकुमार गायकवाड, उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, अंमलदार महेश कदम, विलास शिंदे, रमेश चौधर यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news