

शिवाजी शिंदे
पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेतदेखील चक्क इंग्लंडमध्ये जाऊन मुलगा वर्षभरात मास्टर्सची पदवी घेऊन पुण्यात परत आला. त्याला पाहताच हॉटेलात आचारी म्हणून काम करणार्या त्याच्या बाबांनी त्याला गच्च मिठी मारली अन् डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांनी विदेशातून शिकून आलेल्या मुलाच्या पाठीवर शाबासकीची थापही दिली.
शहरातील एका हॉटेलमध्ये तब्बल तीस वर्षांहून अधिक काळ आचारी (कूक) म्हणून काम करणार्या एका जिद्दी माणसाची ही गोष्ट. कोरोना काळातील पहिल्या लाटेत शिवाजी कसबे यांनी पोटाला चिमटा काढत महत्प्रयासाने मुलगा अजयला विदेशात शिक्षणासाठी पाठविण्याचा निश्चय केला. परिस्थिती जेमतेम असतानाही कसबे यांनी मुलाला बीई (प्रॉडक्शन) केले. सिंहगड कॉलेजमधून तो 2017 मध्ये बीई उत्तीर्ण झाला. त्यानंतर 'बाबा, मला विदेशात शिकायला जायचंय…,' हेे मुलाचे शब्द ऐकले आणि काय करावं, हे त्यांना समजेना; पण क्षणाचाही विलंब न लावता मनात हिम्मत बांधली अन् हॉटेलच्या मालकाला विनंती केली. मालकानेही अजयची हुशारी पाहून त्याला विदेशात शिक्षणासाठी जायला पाठबळ दिले.
बीई झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विदेशात जाण्याचे अजयचे स्वप्न पूर्ण होत नव्हते. शासकीय शिष्यवृत्तीसाठी तो प्रयत्न करीत होता. अखेर तीन वर्षांनंतर 2020 मध्ये त्याची राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाच्या वतीने इंग्लंडमधील मँचेस्टर विद्यापीठात पदव्युत्तर पदवीसाठी (मास्टर्स) निवड झाली. त्यासाठी त्याला सरकारची 35 लाख रुपये शिष्यवृत्ती मिळाली, पण इंग्लंडला जाण्यासाठी स्वत:जवळ काही पैसे लागतात. ते कुठून आणायचे..! हा प्रश्न होताच.
अखेर दोन-अडीच लाख रुपये वडिलांनी हॉटेल मालकाकडून उसने घेतले आणि डिसेंबर 2020 मध्ये तो कोरोनाच्या लाटेतच सौदी अरेबियामार्गे मँचेस्टरमध्ये पोहचला. त्या वेळी परिस्थिती भीतीदायक होती. तरीही त्याने दोन वर्षांचा हा अभ्यासक्रम एकाच वर्षात पूर्ण केला. डिसेंबर 2021 मध्ये अभ्यासक्रम पूर्ण करून नुकताच तो पुण्यात आपल्या घरी पोहचला तेव्हा आई अनिता, वडील शिवाजी यांचे डोळे पाणावले. चाळीस वर्षांपासून आचारी म्हणून नोकरी करणार्या शिवाजी यांच्या चेहर्यावर तेव्हा आपले कष्ट फलद्रुप झाल्याची भावना होती. तेथील विद्यापीठात
एक विषय, एक धडा आठवडाभर शिकवला जातो. जोवर सर्व विद्यार्थ्यांना समजत नाही तोपर्यंत शिक्षक विद्यार्थ्यांची पाठ सोडत नाहीत. मी रिलायबिलिटी इंजिनिअरिंग या विषयात पदवी मिळवली. कंपनीत जेव्हा उत्पादन करणारे यंत्र बंद पडते, तेव्हा कारखान्याचे खूप नुकसान होते. त्याला ब्रेकडाऊन असे म्हणतात. हे ब्रेकडाऊन कमीत कमी कसे होईल किंवा यंत्राचा वेग कसा पूर्ववत होईल, यावर आम्हाला वर्षभर शिकविले गेले.
– अजय कसबे
https://youtu.be/gUWZqZyNLD0