पुणे: महापालिकेच्या एका महिला वैद्यकीय अधिकार्याची शहर भाजपच्या एका पदाधिकार्याकडून छळवणूक सुरू असल्याचा गंभीर प्रक्रार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे महापालिका आयुक्तांपासून महिला तक्रार समितीकडे तक्रार करूनही काहीच कार्यवाही न झाल्याने अखेर या महिला अधिकार्याने आता राज्य महिला आयोगाकडे तक्रार करीत दाद मागितली आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकारानंतर महिलांच्या छळवणुकीचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. केवळ कौटुंबिकच नाही, तर कामाच्या ठिकाणीही महिलांची छळवणूक होत असल्याचे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील महिला वैद्यकीय अधिकार्याने केलेल्या तक्रारीवरून उजेडात आले आहे. (Latest Pune News)
भाजपच्या एका आघाडीच्या अध्यक्षाकडून गेल्या पाच महिन्यांपासून या महिला अधिकार्याला त्रास देण्याचे काम सुरू आहे. याबाबत संबंधित महिला अधिकार्याने जानेवारी महिन्यात महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार करून त्यांच्यावर झालेली आपबिती सांगून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सुरक्षित वातावरण मिळावे, यासाठी कार्यवाही करण्याची विनंती केली होती.
मात्र, आयुक्तांनी त्या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यानंतर संबंधित अधिकार्याने महापालिकेच्या अंतर्गत महिला तक्रार समितीकडे तक्रार केली होती. मात्र, त्यावर केवळ सुनावणी झाली, पुढे काय कारवाई झाली, हे समितीकडून कळविण्यात आले नाही.
दरम्यान, भाजपच्या संबंधित पदाधिकार्याकडून कार्यालयात येऊन त्रास देण्याचा प्रकार सुरूच असल्याने अखेर आता या महिला अधिकार्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली.
या तक्रारीची दखल घेऊन आयोगाच्या अधिकार्यांनी नुकतीच महापालिकेत येऊन अधिकार्याकडून माहिती घेतली असल्याचे या अधिकार्याकडून सांगण्यात आले. दरम्यान, महापालिकेच्याच वरिष्ठ अधिकार्यांची अशी छळवणूक होत असेल आणि तक्रारीनंतरही न्याय मिळत नसेल तर दाद कोणाकडे मागायची? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कार्यालयात येऊन अर्वाच्य भाषेत दमदाटी
महिला वैद्यकीय अधिकार्याने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित पदाधिकारी हा 10 ते 15 कार्यकर्ते घेऊन कार्यालयात येतो. माहिती अधिकारात माहिती मागण्याच्या नावाखाली धुडगूस घालतो. मी जनमाहिती अधिकारी नाही, असे सांगितल्यानंतरही माझे व माझ्या महिला सहकार्यांचे व्हिडीओ चित्रीकरण करतो. मी कार्यालयात नसतानाही कार्यालयात येऊन ‘तिला बघून घेतो,’ अशी दमबाजी करतो. या प्रकारामुळे कामाच्या ठिकाणी सुरक्षित वाटत नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.