पुणे: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू असतानाच पक्षाच्या वर्धापन दिनानिमित दोन्ही पक्षांकडून पुण्यात स्वतंत्र मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रदेशचा मेळावा बालेवाडीतील क्रीडासंकुलात होणार असून, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मेळावा बालगंधर्व रंगमंदिरामध्ये होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे काही आमदार आणि खासदार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत सत्तेत सहभागी होण्यासाठी आग्रही आहेत. त्यावरून दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Latest Pune News)
खुद्द थोरल्या पवारांनी यासंबंधीचा निर्णय खासदार सुप्रिया सुळे घेतील, असे एका मुलाखतीत स्पष्ट केले होते. त्यामुळे आता हे दोन्ही पक्ष नक्की कोणत्या मुहूर्तावर एकत्र येणार? यासंबंधीचे तर्कवितर्क लढविले जात आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या येत्या 10 जून रोजीच्या वर्धापन दिनाला याबाबत काही घडामोडी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, वर्धापन दिनाला दोन्ही राष्ट्रवादी पुण्यात मेळाव्याच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेवाडीतील क्रीडासंकुलात प्रदेशचा मेळावा होणार आहे. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व नेते, मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा वर्धापन दिन मेळावा बालगंधर्व रंगमंदिरामध्ये होणार असून, या वेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात एकत्र नक्की काय चर्चा होणार, कोणते ठराव होणार आणि दोन्ही पक्ष येण्याबाबत चर्चा होणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.