

Anurag Thakur criticizes Rahul Gandhi
पुणे: "विरोधी पक्ष भरकटलेल्या अवस्थेत आहे. संसदेचे अधिवेशन सुरु असताना विरोधी पक्षनेते तिथे नसतात. स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात ते नसतात. नुकत्याच झालेल्या उपराष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्याला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दांडी मारली.
१० वर्षे विरोधी पक्षनेतेपद रिकामे होते. यावेळी त्यांना विरोधी पक्ष होण्याची संधी मिळाली. मात्र ते देशाला गरज असते, तिथे उपस्थित नसतात. भारताचा विरोध करण्यासाठी मात्र राहुल गांधी आघाडीवर असतात," अशी टीका माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली. (Latest Pune News)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आयोजित पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली व पुणे वॉकेथॉनचे उद्घाटन केल्यानंतर अनुराग ठाकूर माध्यमांशी बोलत होते. उपराष्ट्रपतींच्या शपथविधीला राहुल गांधी गैरहजर असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
भारत-पाकिस्तान सामन्यावर बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले, "आंतरराष्ट्रीय स्पर्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) किंवा आशियाई क्रिकेट परिषद (एसीसी) घेत असते. अशा स्पर्धांमध्ये प्रत्येक देशाने सहभाग घेणे आवश्यक असते.
भाग घेतला नाही, तर त्या देशाच्या संघाला स्पर्धेबाहेर व्हावे लागते आणि प्रतिस्पर्धी संघाला त्याचे नाहक गुण मिळतात. द्विपक्षीय मालिकेत पाकिस्तानसोबत खेळायचे नाही, ही भूमिका भारताने घेतलेली आहे. जोवर पाकिस्तानकडून भारतावर होणारे दहशतवादी हल्ले थांबत नाहीत, तोवर पाकिस्तानशी द्विपक्षीय मालिका होणार नाही."
मोदीजींच्या आईवरील व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अनुराग ठाकूर म्हणाले, “आईचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात सर्वोच्च असते. पण काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल इतके खालच्या स्तराला गेले आहेत, की पंतप्रधानांच्या स्वर्गवासी मातोश्रींविषयी त्यांनी अपशब्द वापरले, शिव्या दिल्या, 'एआय' वापरून चुकीचे व्हिडिओ काढले.
यावरून काँग्रेसची मानसिकता स्पष्ट होते. राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर जाण्याची गरज आहे का? माफी मागायची सोडाच, त्यांनी दुसऱ्यांदा पुन्हा तीच चूक केली. बिहारची आणि देशाची जनता काँग्रेसला कधीही माफ करणार नाही. येणाऱ्या निवडणुकांत काँग्रेसला मोठा फटका बसणार हे निश्चित आहे.”