

पुणे: जिल्हा परिषद निवडणूक आणि केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) एकाच दिवशी 7 फेबुवारी रोजी आल्याने अनेक शिक्षकांसमोर पेच निर्माण झाला होता. अखेर निवडणुकीच्या कामकाजातून परीक्षा देणाऱ्या शिक्षकांना वगळण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील साडेतीन हजार शिक्षकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. या शिक्षकांच्या जागी नगरपरिषद निवडणुकीत तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आली आहे. बुधवारी (दि. 4) या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाने अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे परीक्षार्थी शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी बहुतांश सर्वच विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यात शिक्षकांचाही समावेश होता. मात्र, सध्या शिक्षक म्हणून कार्यरत असलेले व बढतीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांसाठी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक करण्यात आली आहे. ही परीक्षा मतदानाच्या दिवशीच होणार आहे. त्यामुळे या शिक्षकांना निवडणूक कामकाज द्यायचे की परीक्षा देण्यास मुभा द्यायची, असा संभम जिल्हा प्रशासनापुढे निर्माण झाला होता.
3,474 शिक्षकांना निवडणूक कामातून सूट
निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या सुमारे 19 हजार कर्मचाऱ्यांपैकी एकूण शिक्षकांची संख्या 16 हजार 403 इतकी आहे. त्यातील 3 हजार 474 शिक्षक या परीक्षेला बसले आहेत. त्यांना जि. प., पं. स. निवडणूक कामातून सूट देण्यात आली असून, त्यांच्या जागी अन्य विभागांतील कर्मचाऱ्यांना कामकाजाची नियुक्ती देण्यात आली आहे.
आयुक्तांकडून आढावा
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी ऑनलाइन बैठकीद्वारे जिल्ह्याच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. मतदान केंद्रांची संख्या, तेथील सुविधा, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तसेच दुबार मतदारांच्या मुद्द्यांवर त्यांनी माहिती घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी कायदा-सुव्यवस्था, सुरक्षाव्यवस्था आणि मनुष्यबळ नियोजनाबाबत सादरीकरण केले. जिल्हाधिकारी डुडी यांनी जिल्ह्यातील मतदारसंख्या, मतदान केंद्रांची रचना व मतमोजणी नियोजनाची माहिती दिली.
जिल्ह्यात 3,605 मतदान केंद्र असून, 23 हजार 114 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगितले. सर्व मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. जिल्ह्यात 13 ठिकाणी स्ट्राँग रूम तयार करण्यात आल्या असून, तेथे चोवीस तास सुरक्षा ठेवण्यात येणार आहे. मतदान जनजागृती मोहीम, तपासणी पथकांची नियुक्ती व प्राप्त तक्रारींवर केलेल्या कारवाईची माहितीही त्यांनी दिली.