मंचर : वस्तू आणि सेवा करातील (जीएसटी) कपातीमुळे बांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिमेंट, लोखंड, स्टील, विटा यांसारख्या बांधकाम साहित्यावरील कर कमी झाल्यास घर बांधणीच्या खर्चात थेट 3 ते 5 टक्क्यांनी घट होऊ शकते. परिणामी परवडणाऱ्या श्रेणीतील घरांना चालना मिळणार असून, सर्वसामान्यांना स्वस्त घरांचा लाभ मिळू शकतो.
गेल्या काही वर्षांत बांधकाम साहित्याच्या दरवाढीमुळे गृहबांधणी प्रकल्पांचे खर्च वाढले होते. त्यामुळे घर खरेदी ही सामान्य कुटुंबांच्या आवाक्याबाहेर जात होती. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे बिल्डर व गृहनिर्माण संस्था ग्राहकांसाठी अधिक सोयीची व किफायतशीर घरे उपलब्ध करून देऊ शकतील. (Latest Pune News)
गृहनिर्माण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे की, कर कपातीमुळे परवडणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांना गती मिळेल. ग्रामीण व शहरी भागातील मध्यमवर्गीय तसेच निम्नमध्यमवर्गीय कुटुंबांसाठी ही निश्चितच आनंदाची बाब ठरेल.
याशिवाय बांधकाम व्यावसायिक, शेतकरी मजूर आणि संबंधित पुरवठा साखळीतील घटकांना रोजगाराच्या संधीही वाढतील. याबाबत माहिती देताना मंचर येथील बांधकाम व्यावसायिक आनंद धोंडीभाऊ शिंदे व उद्योजक वसंतराव पडवळ यांनी सांगितले की, या निर्णयामुळे क्षेत्रात सकारात्मक बदल अपेक्षित आहेत.
सरकारच्या या पावलामुळे ‘घर सबका सपना’ या संकल्पनेला बळ मिळणार असून, घर खरेदीची वाट पाहणाऱ्या हजारो कुटुंबांना दिलासा मिळेल.
- प्रवीण बढेकर, बढेकर गृप, पुणे
जीएसटी कपातीमुळे बांधकाम साहित्याची मागणी वाढेल. ग्राहकांना दर कमी मिळतील आणि विक्रीत वाढ होईल, त्यामुळे व्यवसायालाही बळ मिळेल.
- वैभव व गौरव शिंदे, शिंदे सेल्स कॉर्पोरेशन, अवसरी फाटा-मंचर