

मंचर: सोने आणि चांदीच्या बाजारपेठेत दरवाढीने इतिहासातील उच्चांक गाठला आहे. दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना सोनं-चांदी खरेदी परवडत नसल्याने बाजारपेठातील उलाढाल मंदावली आहे. दरम्यान विवाह किंवा अन्य महत्त्वाच्या मुहूर्तांना सोने खरेदी करण्यात येत असल्याने वाढत्या दरामुळे ग्राहकांचे खिसे रिकामे झाले आहेत.
सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर 10 हजार 697 रुपये प्रती ग्राम असून, तो तब्बल 1 लाख 12 हजार रुपये प्रती 10 ग्राममपर्यंत मंगळवारी (दि. 9) पोहोचला. चांदीचा दरही 1 लाख 28 हजार 500 रुपये प्रति किलो झाला असून, काही बाजारपेठेत तो 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. (Latest Pune News)
सहा महिन्यांपूर्वी सोन्याचा भाव 9 हजार 800 ते 10 हजार रुपये प्रति ग्राम होता, तर चांदीच्या दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्रामहकांना सोनं-चांदी खरेदी परवडत नसल्याने बाजारपेठातील उलाढाल मंदावली आहे. विवाहसोहळे आणि उत्सव काळातही ग्राहकांचा उत्साह कमी झाला आहे.
सोने आणि चांदीची दरवाढ मुख्यत्वे डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन, जागतिक अस्थिरता, औद्योगिक मागणी आणि केंद्रीय बँकांकडून होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील खरेदीमुळे झाल्याचा अंदाज आहे.
- प्रकाश काजळे, सोने-चांदीचे व्यापारी, मंचर
सोने-चांदीचे दर गगनाला भिडल्यामुळे बाजारपेठा ठप्प आहेत. विवाहसोहळे, सण-उत्सव काळात दागिने घेण्याची ग्राहकांना इच्छा असली तरी भावामुळे मागे हटावे लागते.
- सुनील शहाणे आणि रूपाली शहाणे, सोने-चांदीचे व्यापारी, मंचर