

मंचर: आंबेगाव तालुक्यातील चिंचोली (कोकण्याची) येथील घरगुती ग्राहक कालिदास रामचंद्र रोकडे यांना महाविरण कंपनीने आधी अवाजवी वीजबिल लावले, तक्रारी नंतर ते दुरुस्त केले तरी ते अवाढव्याच राहिल्याने ते न भरल्याने अखेर रोकडे यांचा वीज जोडच महावितरण कंपनीने तोडून टाकल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
तातडीने घराचा वीजपुरवठा सुरू करावा,अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा अखिल भारतीय मराठा संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अंकुश लांडे यांनी घोडेगाव येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता यांना गुरुवारी (दि.11) दिलेल्या निवेदनात दिला आहे. (Latest Pune News)
कालिदास रोकडे यांनी 2023-24 या वर्षात नियमित वीजबिल भरलेले असूनही त्यांना अचानक तब्बल 1 लाख 20 हजार रुपयांचे अवाजवी बिल देण्यात आले. याबाबत त्यांनी तक्रार केल्यानंतर फेरतपासणी करून 40 हजार रुपयांचे बिल करण्यात आले, ही रक्कमसुद्धा मोठी असल्याने तसेच रोकडे यांची आर्थकि परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने ही रक्कम भरणे त्यांना अशक्य आहे.
अनेक वर्षे महावितरणकडून अंदाजे वीजबिल आकारण्यात येत असल्याने ग््रााहकांना अन्याय सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वीजजोड तोडल्यामुळे रोकडे यांच्या कुटुंबाला अंधारात दिवस काढावे लागत आहेत. या गंभीर प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन अन्यायकारक वीजबिल कमी करून वीजजोड सुरू करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
कालिदास रोकडे यांनी नोव्हेंबरपासून बिल भरले नव्हते, एप्रिल मध्ये दहा हजार रुपये भरले. मीटरमध्ये काही दोष आहे, म्हणून मीटरही बदली केल्यानंतरही ज्या पद्धतीने पहिले वीजबिल येत होते. त्याच पद्धतीने वीज वापर असल्याचे दिसून आले. त्यांची परिस्थिती जेमतेम असल्याने त्यांना टप्पा पद्धतीने वीजभरणा करण्यासाठी सांगितले. याबाबत त्यांच्या काही शंका असतील तर त्यांनी घोडेगाव महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. त्यांना वीजबिलासंदर्भात सविस्तर माहिती देऊन शंका समाधान केले जाईल.
- आर. पी. भोपळे, उपकार्यकारी अभियंता, घोडेगाव महावितरण