चांगली बातमी : ‘एक्स्प्रेस-वे’वरील अपघातांमध्ये यंदा घट

चांगली बातमी : ‘एक्स्प्रेस-वे’वरील अपघातांमध्ये यंदा घट

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सातत्याने अपघातांसाठी ओळखला जाणार्‍या 'पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे'वर (यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग) 2023 मध्ये अपघातांच्या संख्येत घट झाल्याचे समोर आले आहे. यात 2022 मध्ये झालेल्या अपघातांपेक्षा 2023 मध्ये तब्बल 82 अपघात कमी झाले आहेत. विविध उपायोजनांमुळे येथील अपघात रोखण्यात यश आले. ही कामे अपर पोलिस महासंचालक (वाहतूक) डॉ. रविंदर सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली, असे सहायक पोलिस निरीक्षक (महामार्ग) योगेश भोसले यांनी सांगितले.

महामार्ग पोलिसांनी नुकतीच 2022-23 वर्षांतील अपघाताची आकडेवारी प्रसिद्ध केली. त्यात पुणे-मुंबई महामार्गावरील अपघातांमध्ये घट झाल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2022 आणि जानेवारी ते नोव्हेंबर 2023 या कालावधीतील अपघातांची माहिती महामार्ग पोलिसांनी प्रसिद्ध केली. त्यामध्ये 2022 या कालावधीत 'एक्स्प्रेस-वे'वर 182 अपघात झाले होते. मात्र, 2023 मध्ये यात 82 अपघातांनी घट झाली असून, 140 अपघातांच्या घटना घडल्या आहेत. पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवरील अपघात रोखण्यात महामार्ग पोलिसांना काही प्रमाणात यश आले आहे. परंतु, विकेंडला होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी अजूनही ठोस उपाय होणे आवश्यक आहे.

2023 मधील अपघातांची स्थिती…

  • एकूण मृत्यू – 61
  • गंभीर जखमी – 86
  • किरकोळ जखमी – 30
  • 2022 मधील
  • अपघातांची स्थिती
  • एकूण मृत्यू – 83
  • गंभीर जखमी – 113
  • किरकोळ जखमी – 31

महामार्ग पोलिसांनी केल्या या उपाययोजना

  • संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून महामार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती.
  • ठिकठिकाणी माहितीदर्शक फलक लावले.
  • एक्प्रेस-वेवरील अंडा पॉइंटवर 'हाईट बॅरिअर' बसविले.
  • शिंग्रोबा घाटातून खाली जाणार्‍या अवजड वाहनांना रोखले.
  • कोंडी सोडविण्यासाठी ठिकठिकाणी ब्लॉक घेण्यात आले.
  • गाडी पुणे कॉरिडॉरवरून मुंबई कॉरिडॉरवर जाऊ नये, याकरिता किलोमीटर 40 वर सीसीबीचे काम पूर्ण करण्यात आले.
  • किलोमीटर 36-39 येथे ब्लॅक स्पॉट ठिकाणी चौथी लेन सुरू.
  • या भागातील अंधार कमी करण्यासाठी लाइट्स बसविण्यात आल्या आहेत.

आरटीओकडूनही 24 तास गस्त

पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवरील अपघात कमी करण्यासाठी 2023 मध्ये महामार्ग पोलिसांसोबतच परिवहन विभागाने देखील सक्रिय कार्य केले आहे. यात परिवहन विभागाकडून राज्यातील आरटीओ कार्यालयांमधील वायुवेग पथकांची 24 तास गस्त सुरू ठेवण्यात आली होती. त्या वेळी मोटार वाहन निरीक्षकांनी अनेक वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती केली. त्यासोबतच बेशिस्तपणे वाहने चालविणार्‍या वाहनचालकांवर धडक कारवाई करण्यात आली. त्यामुळे देखील अपघात रोखण्यास मदत झाली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news